शिक्षण आयुक्तांकडून पाहणी; आवश्यक सुविधांना प्राधान्य
पुणे – करोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता पुणे व पिंपरी-चिंचवड शहरात क्वारंटाईन कक्षांची उभारणी वेगाने करण्यात येऊ लागली आहे. या कक्षांमध्ये आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे.
क्वारंटाईन फॅसिलिटी उपलब्ध करून देण्यासाठी व त्यावर देखरेख ठेवण्यासाठी नोडल ऑफिसर म्हणून शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. नियुक्ती होताच शिक्षण आयुक्तांनी अधिकाऱ्यांची पाच पथकेही तैनात केली आहेत. शिक्षण आयुक्तांनी शहरातील क्वारंटाईनच्या कक्षाची पाहणी करुन सुविधा उपलब्ध करून देण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. अधिकाऱ्यांकडून त्यांनी दररोज आढावा घेण्यालाही प्राधान्य दिले आहेत. यावेळी त्यांच्यासोबत उपजिल्हाधिकारी श्रीमंत पाटोळे, पुणे महापालिकेचे उपायुक्त राजेंद्र मुठे, अभिषेक सावरीकर, सिध्देश वाडकर यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.
पुणे शहरासाठी सणस क्रीडा संकुलात 150, धायरी येथील लायगुडे हॉस्पिटलमध्ये 50, खराडी येथील अंपग कल्याणच्या वस्तीगृहात 100, वाघोली येथील भारतीय जैन संघटनेच्या शिक्षण संकुलात 100 याप्रमाणे बेडची व्यवस्था करण्यात आलेली आहे. या सर्व ठिकाणी शिक्षण आयुक्तांनी भेट देऊन पाहणी केली.
पिंपरी-चिंचवड शहरासाठी बालेवाडी कॉम्प्लेक्स आणि मोशी येथील समाज कल्याण वसतीगृहात भेट देवून तेथील पिंपरी चिंचवड महानगरपालिका व अन्य अधिकारी व कर्मचारी यांचे समवेत सविस्तर चर्चा करून आढावा घेतला.