भारतात येण्यासाठी ‘राफेल’ च्या पहिल्या तुकडीचे फ्रान्समधून ‘टेकऑफ’

नवी दिल्ली : बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित ‘राफेल’ विमानांच्या पहिल्या तुकडीने फ्रान्समधून भारतात येण्यासाठी उड्डाण केले आहे. पहिल्या तुकडीत एकूण पाच विमाने आहेत. ही विमाने बुधवारी २९ जुलै रोजी भारतात लँडिंग करणार आहेत. हरयाणामधील अंबाला एअर फोर्स स्टेशनवर ही विमाने उतरणार आहेत. २०१६ साली भारताने फ्रान्स सरकार बरोबर ३६ राफेल फायटर विमाने खरेदी करण्याचा ५९ हजार कोटींचा करार केला आहे. त्यातील पहिली पाच विमानांची तुकडी या आठवड्यात देशात दाखल होणार आहे.
राफेल फायटर जेटच्या हाताळणीसाठी भारतीय वायू दलाचे बारा वैमानिक आणि इंजिनिअरींग क्रूला पूर्णपणे प्रशिक्षित करण्यात आले आहे. उड्डाणवस्थेत असतानाच या विमानांमध्ये इंधन भरण्यात येईल तसेच अंबालामध्ये येण्यापूर्वी ही विमाने यूएईमधील फ्रेंच तळावर लँडींग करतील. फ्रान्समधील तळावरुन उड्डाण करण्यापूर्वी फ्रान्समधील भारतीय राजदूताने भारतीय वैमानिकांबरोबर चर्चा केली.
#WATCH Rafale jets taking off from France to join the Indian Air Force fleet in Ambala in Haryana on July 29th. (Video source: Embassy of India in France) pic.twitter.com/UVRd3OL7gZ
— ANI (@ANI) July 27, 2020
सर्व काही नियोजनानुसार झाले, तर २० ऑगस्टला पारंपारिक पद्धतीने सोहळा आयोजित करुन या फायटर विमानांचा भारतीय हवाई दलात समावेश करण्यात येईल.भारतीय वायू दलाच्या एअर क्रू आणि ग्राऊंड क्रू टीमला हे विमान कसे हाताळायचे, त्याबद्दल व्यापक असे प्रशिक्षण देण्यात आले आहे. भारताने फ्रान्सबरोबर अशी ३६ राफेल विमाने खरेदी करण्याचा करार केला आहे. पूर्णपणे अत्याधुनिक शस्त्रास्त्रांनी सुसज्ज विमाने फ्रान्सकडून भारताला देण्यात येतील. भारतात दाखल झाल्यानंतर लवकरात लवकर या विमानांचा वापर करण्यावर लक्ष केंद्रीत करण्यात येईल.
राफेलचे पहिले स्क्वाड्रन अंबाला एअर बेसवर तर दुसरे स्क्वाड्रन पश्चिम बंगाल हाशिमारा येथे असेल. भारताला मिळणारी राफेल फायटर विमाने मिटिओर आणि स्काल्प अशा मिसाइल्सनी सुसज्ज असतील. यामुळे शत्रुच्या प्रदेशात खोलवर अचूक हल्ला करण्याची भारतीय हवाई दलाची क्षमता कैकपटीने वाढणार आहे तसेच हवाई वर्चस्व सुद्धा प्रस्थापित करता येईल. सध्या चीन आणि पाकिस्तानकडे राफेलच्या तोडीचे एकही विमान नाहीय.




