राफेल आज अधिकृतपणे हवाई दलात समाविष्ट

नवी दिल्ली – हवाई दलाची मारक क्षमता वाढवणारी राफेल लढाऊ विमाने आज समारंभपूर्वक हवाई दलाच्या ताफ्यामध्ये समाविष्ट केली जाणार आहेत. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, फ्रान्सच्या संरक्षण मंत्री फ्लोरेन्स पार्ली आणि लष्कराच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत अंबाला येथील हवाई दलाच्या तळावर हा समारंभ होणार आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
राफेल विमाने भारतीय हवाई दलाच्या ताफ्यामध्ये औपचारिकरित्या समाविष्ट करण्यासाठीच्या समारंभाला उपस्थित राहण्यासाठीच फ्रान्सच्या संरक्षण मंत्री फ्लोरेन्स पार्ली भारतात येत आहेत. सकाळी त्या अंबाला येथे पोहोचतील. या समारंभानंतर फ्रान्सबरोबरचे संरक्षण आणि सुरक्षा विषयक भागीदारी संबंध अधिक दृढ करण्यासाठी राजनाथ सिंह आणि फ्लोरेन्स पार्ली यांच्यामध्ये अंबाला येथे द्विपक्षीय चर्चाही होणार आहे. फ्रान्समधील दासॉल्ट एव्हिएशन कंपनीने भारतासाठी या विमानांचे उत्पादन केले आहे.
भारत सरकारने 59 हजार कोटी रुपये किंमतीच्या 36 राफेल विमानांच्या खरेदीसाठी फ्रान्स सरकारबरोबरच्या करारावर स्वाक्षऱ्या केल्यानंतर चार वर्षांनी राफेल लढाऊ विमानांची पहिली तुकडी 29 जुलै रोजी भारतात दाखल झाली आहे. मात्र ही विमाने औपचारिकपणे हवाई दलात समाविष्ट झालेली नाहीत. आतापर्यंत भारताला 10 राफेल विमाने देण्यात आलेली आहेत. त्यापैकी 5 विमाने हवाई दलाच्या वैमानिकांच्या प्रशिक्षणासाठी फ्रान्समध्येच ठेवण्यात आली आहेत.
सर्व 36 विमाने 2021 च्या अखेरीपर्यंत भारताला मिळणे अपेक्षित आहे. चार विमानांची दुसरी तुकडी नोव्हेंबरपर्यंत भारतात पोहोचणे अपेक्षित आहे. तर उर्वरित विमाने फ्रान्समधून भारतात आणण्याच्या संभाव्य कालावधीबाबत राजनाथ सिंह आणि पार्ली यांच्यात चर्चा होणार आहे.
वेगवान प्रवास आणि अचूक मारक क्षमतेबाबत प्रसिद्ध असलेली राफेल विमाने हवाई दलाची क्षमता आणखीन वाढणार आहे. 23 वर्षांपूर्वी सुखोई विमाने हवाई दलासाठी खरेदी केली गेली होती. राफेल विमानांची पहिली तुकडी अंबाला हवाई तळावर असेल. तर दुसरी तुकडी पश्चिम बंगालमधील हसिमारा येथील तळावर तैनात असेल.
मेटीओर क्षेपणास्त्रांनी सज्ज…
राफेल विमानांवर मेटीओर आणि स्काल्प क्रूझ क्षेपणास्त्र बसवली जाऊ शकतात. हवेतून हवेत मारा करणाऱ्या क्षेपणास्त्रांमध्ये मेडीओर ही ‘एमबीडीए’कडून विकसित केली गेलेली सर्वात आधुनिक क्षेपणास्त्रे आहेत. ब्रिटन, जर्मनी, इटली, फ्रान्स, स्पेन आणि स्वीडन या देशांना भेडसावणाऱ्या हवाई धोक्याचा सामना करण्यासाठी हे क्षेपणास्त्र विकसित केले गेले आहे. फ्रान्सकडून मिळणाऱ्या 36 विमानांपैकी 30 विमाने लढाऊ विमाने तर उर्वरित 6 विमाने प्रशिक्षणासाठी असणार आहेत. प्रशिक्षणाच्या विमानांमध्ये दोन सीट असतील आणि लढाऊ विमानांची सर्व वैशिष्ट्ये त्यात असतील.





