अलिबागच्या आलिशान घरामध्ये रणवीर-दीपिकाने केला गृहप्रवेश ! फोटो पाहून चाहते म्हणतात, मुंबई सोडली काय ?

मुंबई – अभिनेता रणवीर सिंह आणि दीपिका पदुकोण ही बॉलिवूडमधील बहुचर्चित जोडी आहे. त्यामुळे त्यांच्या आयुष्यात काय चाललं आहे हे जाणून घेण्याची उत्सुकता सर्वांनाच असते. नुकतंच या दाम्पत्याने आपल्या नव्या घरात गृह प्रवेश केल्याचे आपल्या सोशल मीडियावरून सांगितले. हा गृहप्रवेश मुंबईतल्या नव्या घरी झाला नसून अलिबाग येथील घरामध्ये झाला असल्याचे रणवीरने टाकलेल्या स्टेटसवरून समजते.

अगदी साध्य पद्धतीने घरगुती पूजा करून रणवीर दीपिकाने आपल्या घरात प्रवेश केल्याचे समजते. रणवीरने सोशल मीडियावर पूजेचे काही फोटो पोस्ट केले आहेत. या पूजेसाठी केवळ आणि केवळ कुटुंबातील सदस्यांनी उपस्थिती लावल्याचे समजते. रणवीर आणि दीपिका दोघांनीही गृह प्रवेश पूजासाठी पांढऱ्या पोशाखांची निवड केली. टाकलेल्या फोटोमध्ये ते धार्मिक विधी करताना दिसत आहेत. पण दोघांचे चेहरे कोणत्याही फोटोमध्ये दिसत नाहीत, एका फोटोत दोघांचे पूजा करतानाचे हात दिसत आहेत.

या वर्षी जुलैमध्ये, रणवीर सिंग आणि त्याच्या वडिलांनी मुंबईत 119 कोटी रुपयांना एक अपार्टमेंट खरेदी करण्याचा करार केला होता. ते इमारतीच्या 16व्या, 17व्या, 18व्या आणि 19व्या मजल्यावर पसरलेले सी व्ह्यूव लक्झरी अपार्टमेंट आहे. या इमारतीत एकूण 19 पार्किंग स्लॉट आहेत. याबाबतचे वृत्त देखील अनेक मीडिया हाऊसने दिले होते. चाहत्यांनी मात्र गृह्प्रवेशाच्या फोटोंवर जोरदार कमेंटबाजी केली आहे.काहींनी रणवीरला मुंबई सोडली का ? असा प्रश्न केला आहे तर काहींनी थेट पार्टी मागितली आहे.





