Ranveer Singh: ना शाहरुख, ना रजनीकांत! रणवीर सिंह ठरला भारतातील सर्वाधिक मानधन घेणारा अभिनेता; कमावले तब्बल ३२५ कोटी रुपये
Ranveer Singh चित्रपटाच्या थिएटरमधील कमाईसोबतच डिजिटल हक्क, सॅटेलाइट हक्क आणि इतर बोनस यांचा समावेश करून रणवीर सिंहची एकूण कमाई ३२५ कोटी रुपयांपर्यंत पोहोचल्याचं म्हटलं जात आहे.

Ranveer Singh: बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंहने भारतीय चित्रपटसृष्टीत नवा इतिहास रचल्याची चर्चा सध्या जोरात सुरू आहे. अनेक वर्षे बॉक्स ऑफिसवर वर्चस्व गाजवणाऱ्या शाहरुख खान, रजनीकांत, प्रभास आणि अल्लू अर्जुन यांसारख्या सुपरस्टार्सना मागे टाकत रणवीर सिंह भारतातील सर्वाधिक मानधन घेणारा अभिनेता ठरल्याचं सांगितलं जात आहे.
एकेकाळी एखाद्या अभिनेत्याने एका चित्रपटासाठी एक कोटी रुपये मानधन घेणं ही मोठी गोष्ट मानली जात होती. मात्र, काळ बदलला आणि कलाकारांच्या कमाईचे आकडेही झपाट्याने वाढले. आता भारतीय चित्रपटसृष्टीत शेकडो कोटी रुपयांची कमाई करणारे कलाकार पाहायला मिळत आहेत.
२०२६ मध्ये मात्र कमाईचा एक नवा विक्रम समोर आला आहे. अहवालानुसार, रणवीर सिंहने तब्बल ३२५ कोटी रुपयांची कमाई करत नवा इतिहास रचला आहे. याआधी भारतातील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या कलाकारांमध्ये दक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांचं नाव आघाडीवर होतं. त्यांनी एका ब्लॉकबस्टर चित्रपटातून २५० कोटी रुपयांपेक्षा अधिक कमाई केल्याचं सांगितलं जात होतं.
तसेच प्रभास आणि अल्लू अर्जुन यांसारख्या लोकप्रिय कलाकारांनीही त्यांच्या सुपरहिट चित्रपटांमधून सुमारे २०० कोटी रुपयांच्या आसपास कमाई केली होती. बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खान यानेदेखील त्याच्या अलीकडील मोठ्या चित्रपटांमधून जवळपास २०० कोटी रुपयांची कमाई केली होती. मात्र, रणवीर सिंहने या सर्व कलाकारांना मागे टाकत अव्वल स्थान पटकावलं आहे.

Ranveer Singh
या मोठ्या कमाईमागे त्याचा ‘धुरंधर’ हा चित्रपट असल्याचं सांगितलं जात आहे. या चित्रपट मालिकेने जगभरात बॉक्स ऑफिसवर सुमारे ३२०० कोटी रुपयांची कमाई केली आहे. त्यापैकी भारतातील कमाईच १९०० कोटी रुपयांपेक्षा जास्त असल्याचं सांगितलं जात आहे. विशेष म्हणजे, या चित्रपटासाठी रणवीर सिंहने पारंपरिक पद्धतीने निश्चित मानधन घेतलं नव्हतं. त्याऐवजी त्याने चित्रपटाच्या नफ्यात भागीदारी स्वीकारली होती. चित्रपटाचं बजेट वाढल्यानंतर रणवीरने स्वतःही या प्रकल्पात गुंतवणूक केली. त्यामुळे चित्रपटाला मोठं यश मिळाल्यानंतर त्याच्या नफ्यात मोठी वाढ झाली.
चित्रपटाच्या थिएटरमधील कमाईसोबतच डिजिटल हक्क, सॅटेलाइट हक्क आणि इतर बोनस यांचा समावेश करून रणवीर सिंहची एकूण कमाई ३२५ कोटी रुपयांपर्यंत पोहोचल्याचं म्हटलं जात आहे. दरम्यान, ही माहिती समोर आल्यानंतर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चा रंगली आहे. अनेकांनी रणवीरच्या व्यावसायिक निर्णयाचं कौतुक केलं आहे. निश्चित मानधन घेण्याऐवजी नफ्यात भागीदारीचा पर्याय निवडल्यामुळे त्याला मोठा आर्थिक फायदा झाला, असं मत व्यक्त केलं जात आहे.
गेल्या काही वर्षांत भारतीय चित्रपटसृष्टीत मानधनाच्या पद्धतीत मोठे बदल झाले आहेत. अनेक मोठे कलाकार आता ठराविक फी घेण्याऐवजी चित्रपटाच्या नफ्यातील हिस्सा स्वीकारताना दिसत आहेत. एकंदरीत, रणवीर सिंहने केवळ अभिनयातच नव्हे तर व्यावसायिक दृष्टिकोनातूनही मोठी झेप घेतली आहे. त्यामुळे आगामी काळात इतर कलाकारही अशीच रणनीती अवलंबण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.





