Ranji Trophy 2024 : पूजाराचे आणखी एक शतक! इंग्लंडविरुद्धच्या कसोटी संघात पुनरागमनाचे दरवाजे उघडतील का?

Ranji Trophy 2024, Cheteshwar Pujara : आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC) 2021-23 च्या विजेतेपदाच्या सामन्यात टीम इंडियाला ऑस्ट्रेलियाविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला. WTC फायनलमधील या पराभवाचा ठपका चेतेश्वर पुजारावर ठेवण्यात आला, जो पहिल्या डावात 14 आणि दुसऱ्या डावात 27 धावा करून बाद झाला. यानंतर त्याला कसोटी क्रिकेटमध्ये टीम इंडियात पुनरागमन करण्यासाठी खूपच झगडावं लागेल, हे तेव्हा खुद्द पुजारालाही माहीत नसेल. 7-11 जून 2023 रोजी झालेल्या या सामन्यानंतर पुजाराने भारतासाठी एकही कसोटी सामना खेळलेला नाही, परंतु पुजाराने अद्याप कसोटी संघात परतण्याची आशा सोडलेली नाही.
सध्या पुजारा रणजी ट्रॉफीमध्ये सौराष्ट्रकडून खेळत आहे. पुजाराने राजस्थान विरुद्ध सौराष्ट्र सामन्यात 110 धावांची इनिंग खेळून पुन्हा एकदा भारतीय कसोटी संघाचा दरवाजा ठोठावला आहे. हे त्याचे प्रथम श्रेणी कारकिर्दीतील 62 वे शतक ठरले. सौराष्ट्रने 74 धावांत तीन विकेट गमावल्या होत्या आणि संघ अडचणीत असल्याचे दिसत होते, परंतु पुजाराने शेल्डन जॅक्सनच्या साथीने धावसंख्या 242 धावांपर्यंत नेली आणि बाद होण्यापूर्वी सौराष्ट्रला खूप मजबूत स्थितीत आणले. पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत सौराष्ट्राने पहिल्या डावात 4 बाद 242 धावा केल्या होत्या.
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2021-23 च्या अंतिम सामन्यानंतर, पुजाराला वेस्ट इंडिज आणि दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी कसोटी संघात स्थान मिळाले नाही आणि भारत विरुद्ध इंग्लंड पाच कसोटी सामन्याच्या मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांसाठीही त्याला संघात स्थान मिळू शकले नाही. मात्र, सध्याची परिस्थिती आणि रणजी ट्रॉफीतील त्याची कामगिरी पाहता पुजारा इंग्लंडविरुद्धच्या शेवटच्या तीन कसोटी सामन्यांसाठी संघात पुनरागमन करू शकतो, असे दिसते.
निवड समितीने अद्याप शेवटच्या तीन कसोटी सामन्यांसाठी भारतीय संघ जाहीर केलेला नाही. पुजाराच्या या शतकामुळे निवड समितीवरही दडपण येऊ शकते. याशिवाय, विराट कोहलीच्या पुनरागमनाबाबत अद्याप कोणतीही बातमी नाही आणि श्रेयस अय्यर पाठीच्या दुखण्यामुळे त्रस्त आहे आणि तो शेवटचे तीन कसोटी सामने खेळू शकणार नाही अशीही बातमी येत आहे. हे सर्व पाहता पुजारा कसोटी संघात पुनरागमन करू शकतो असे दिसते. रणजी ट्रॉफी 2024 मध्ये, पुजाराने सहा सामन्यांच्या 9 डावात 81 च्या सरासरीने 652 धावा केल्या आहेत. ज्यामध्ये दोन शतके आणि दोन अर्धशतकांचा समावेश आहे.





