Ranjangaon News | फलकांमधून खासदार, आमदारांना इशारा ; मराठा आरक्षणावर भूमिका घ्या

प्रभात वृत्तसेवा
रांजणगाव गणपती – राज्यात मराठा आरक्षणाचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असताना, रांजणगाव गणपती येथे लावलेल्या फलकांमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. रांजणगाव बसस्थानक परिसर तसेच श्रीमहागणपती मंदिराजवळ लावलेल्या फलकांमधून शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे आणि आंबेगाव-शिरूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार दिलीप वळसे पाटील यांनी मराठा आरक्षणाबाबत ठाम भूमिका मांडावी, अन्यथा त्यांच्याविरोधात तीव्र निषेध होईल, असा थेट इशारा देण्यात आला आहे.
मुंबईतील आझाद मैदानावर मनोज जरांगे पाटील यांचे आमरण उपोषण सुरू आहे. मराठा समाजाला कायदेशीर आणि टिकाऊ आरक्षण मिळावे, या मागणीसाठी राज्यभरातून हजारो मराठा बांधव आंदोलनात सहभागी झाले आहेत. अनेक नेते, खासदार व आमदार उपोषणस्थळी जाऊन आपली भूमिका जाहीर करत असले तरी काही लोकप्रतिनिधी अजूनही गप्प राहिल्याने त्यांच्या मतदारसंघात नाराजी वाढू लागली आहे.
रांजणगाव गणपतीत लावलेले फलक स्थानिक पातळीवर असंतोष किती वाढत आहे? याचे उदाहरण आहेत. “जनतेच्या प्रश्नांवर मौन धरणाऱ्या नेत्यांना मतदारसंघ माफ करणार नाही,” अशा तीव्र प्रतिक्रिया नागरिकांकडून उमटत आहेत.दिलीप वळसे पाटील यांनी मंत्रीपद भूषवले असताना मराठा आरक्षणासंदर्भात शासनाच्या निर्णय प्रक्रियेत सक्रिय सहभाग घेतला होता. तसेच खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी संसदेत जनतेचे प्रश्न अनेकदा मांडले आहेत.
मात्र सध्याच्या चळवळीत दोघांची ठोस भूमिका अद्याप स्पष्ट झालेली नसल्याने समाजात अस्वस्थता वाढली आहे.मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर राज्यातील सर्वच राजकीय नेत्यांची खरी कसोटी लागणार आहे. रांजणगाव गणपतीसारख्या धार्मिक आणि ऐतिहासिक स्थळावर लावले गेलेले फलक या संघर्षाची सुरुवात मानली जात असून, पुढील काळात हा विषय अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे.





