प्रभात वृत्तसेवा रांजणगाव गणपती – गाव परिसरात वाढत्या वन्यप्राण्यांच्या हालचालीमुळे सुरक्षेच्या दृष्टीने बिबट्यांना पकडण्यासाठी पिंजरा बसविण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी सातत्याने पाठपुरावा करून वन विभागाकडे केली होती. मागील पाच-सहा दिवसांपासून गावातील नागरिकांना वाड्या-वस्त्यांवर रात्रीच्या वेळी बिबट्यांचे वारंवार दर्शन होत असल्याने हा निर्णय घेण्यात आला.या कामासाठी उठाबा गटाचे युवा सेना जिल्हा प्रमुख संदीप शिंदे, नामदेवराव पाचुंदकर पाटील, नवनाथ आढाव, अनिकेत बांदल, आणि राजू फंड यांनी पुढाकार घेतला. वनविभागाने उपलब्ध करून दिलेले पिंजरे खाजगी वाहनांच्या माध्यमातून रांजणगाव येथील वाड्यावस्यांवरती लावणे व पिंजऱ्यांमध्ये बिबट्यासाठी शिकार ठेवण्याचे काम स्थानिक नागरिकांनी केल्यामुळे, ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे. कारण मागील पाच-सहा दिवसापासून गावातील नागरिकांना वाड्या-वस्त्यांवर रात्रीचा प्रवास करताना अनेक वेळा बिबट्यांचे दर्शन झाले होते. या उपक्रमात शिरूरचे वनरक्षक निलकंठ गव्हाणे, वनरक्षक सविता चव्हाण आणि वनसेवक जयेश टेमकर यांनी विशेष सहकार्य केले. स्थानिक ग्रामस्थांनी वन अधिकाऱ्यांचे आभार मानत, त्यांच्या तत्पर आणि जबाबदार कामगिरीचे कौतुक केले.गावकऱ्यांनी अशा उपक्रमांमुळे मानव-वन्यजीव संघर्ष कमी होऊन सुरक्षिततेची भावना निर्माण होत असल्याचे मत व्यक्त केले.