Ranjangaon MIDC : रांजणगाव एमआयडीसीत खळबळ! गॅस टंचाईने कामगारांचे ‘पलायन’; उद्योगांना घरघर लागणार?
Ranjangaon MIDC : घरगुती गॅस उपलब्ध होत नसल्याने रांजणगाव एमआयडीसीतील कामगारांचे पलायन; कंपन्यांची उत्पादन प्रक्रिया मंदावली.

Ranjangaon MIDC – एमआयडीसी परिसरात निर्माण झालेल्या तीव्र गॅस टंचाईने उद्योग क्षेत्राला मोठा हादरा बसला असून, कामगारांनी मोठ्या प्रमाणावर गावाकडे पलायन करण्यास सुरुवात केली आहे. दैनंदिन जगण्यासाठी आवश्यक असलेला घरगुती गॅस उपलब्ध होत नसल्याने कामगारांनी थेट काम सोडून आपल्या मूळ गावी जाण्याचा मार्ग स्वीकारला आहे. या गंभीर परिस्थितीमुळे औद्योगिक वसाहतीतील कंपन्यांसमोर मनुष्यबळाचे मोठे संकट उभे राहिले आहे.
गॅस टंचाईमुळे कामगारांना स्वयंपाक करणे कठीण झाले असून, खानावळी आणि मेसवरही याचा परिणाम झाला आहे. परिणामी, हवालदिल झालेल्या हंगामी व स्थलांतरित कामगारांनी बेरोजगारी स्वीकारून गाव गाठणे पसंत केले आहे. यामुळे अनेक कंपन्यांमधील उत्पादन प्रक्रिया मंदावली असून काहींचे उत्पादन ठप्प होण्याच्या मार्गावर आहे. कामगारांच्या या स्थलांतरामुळे कंपन्यांच्या उत्पन्नावर थेट परिणाम होण्याची भीती व्यक्त होत असून, उद्योग क्षेत्रात चिंतेचे वातावरण आहे.
ठेकेदारांची मोठी कसरत
कामगारांना थांबवून ठेवण्यासाठी ठेकेदारांना सध्या मोठी कसरत करावी लागत आहे. कामगारांना अतिरिक्त सुविधा, आर्थिक मदत आणि जेवणाची पर्यायी व्यवस्था करूनही परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे चित्र आहे. गॅसअभावी मूळ सुविधाच कोलमडल्याने कामगार थांबण्यास तयार नसल्याचे ठेकेदारांकडून सांगण्यात येत आहे.
प्रशासनाच्या उदासीनतेवर संताप
एमआयडीसीतील या गंभीर समस्येकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप उद्योजकांकडून केला जात आहे. तातडीने गॅस पुरवठा सुरळीत न झाल्यास एमआयडीसीतील उद्योगांवर मोठे आर्थिक संकट ओढवण्याची शक्यता आहे. उद्योग आणि कामगार अशा दोन्ही घटकांना वाचवण्यासाठी शासनाने तातडीने हस्तक्षेप करावा, अशी मागणी होत आहे.





