Ranjangaon | महागणपतीच्या मुक्तद्वार दर्शन सोहळ्याची सांगता

प्रभात वृत्तसेवा
रांजणगाव गणपती – अष्टविनायकांपैकी एक असलेल्या श्रीक्षेत्र रांजणगाव येथील महागणपती मंदिरात गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या मुक्तद्वार दर्शन महोत्सवाची बुधवारी (दि.२८ ऑगस्ट) रोजी सांगता झाली. भाद्रपद शुद्ध प्रतिपदेला प्रारंभ झालेल्या या महोत्सवात लाखो भाविकांनी महागणपतीचे दर्शन घेतले.
या सोहळ्यातील विशेष आकर्षण म्हणजे, महागणपतीला हात लावून व पाणी घालून दर्शन घेण्याची अपूर्व संधी भाविकांना मिळाली. परंपरेनुसार वर्षातून केवळ या चार दिवसांमध्येच भाविकांना अशी सुवर्णसंधी मिळते. या वर्षीच्या महोत्सवात पुणे जिल्ह्यासह महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून भाविक मोठ्या संख्येने रांजणगावात दाखल झाले.
देवस्थानच्या अध्यक्ष स्वाती पाचुंदकर, मुख्य विश्वस्त ओमकार देव, उपाध्यक्ष संदीप दौंडकर, सचिव तुषार पाचुंदकर पाटील, खजिनदार तुषार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली महोत्सवाचे नियोजन करण्यात आले.पिण्याचे शुद्ध पाणी, मोफत महाप्रसाद, वैद्यकीय सुविधा, प्राथमिक आरोग्य केंद्र, तात्पुरते आरोग्य उपकेंद्र, स्वच्छतागृहे, वाहनतळ यांचा समावेश होता.
भाविकांच्या सुरक्षेसाठी पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे यांच्या नेतृत्वाखाली चोख बंदोबस्त ठेवला.या सांगता सोहळ्यासाठी मंदिर व परिसर आकर्षक सजवला होता. विविध धार्मिक विधी, भजन आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. हजारो भाविकांनी या सोहळ्यास उपस्थित राहून महागणपतीचे दर्शन घेणार आहेत.
यावेळी दर्शनासाठी प्रसिद्ध उद्योगपती प्रकाश शेठ धारिवाल, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, माजी राज्यमंत्री सुरेश धस, आमदार बाबाजी काळे, मोनिकाताई राजळे, बापूसाहेब पठारे, माजी आमदार स्नेहलताई काळे, मंगलदास बांदल, विश्वास कोकडे, शशिकांत दसगुडे, सुनिता गावडे, कुसुम मांढरे, रेखाताई बांदल, राणीताई लंके, सहाय्यक धर्मादाय आयुक्त सुधीर कांबळे आदींनी महागणपतीचे स्पर्श दर्शन घेतले.





