Ranjangaon Ganpati: अष्टविनायक रांजणगाव महागणपतीची मुखद्वार यात्रा बुधवार पासून सुरू

रांजणगाव गणपती : भाद्रपद गणेशोत्सवानिमित्त अष्टविनायक पैकी एक असलेल्या श्री क्षेत्र रांजणगाव गणपती येथील महागणपती मंदिरात द्वार यात्रेचा शुभारंभ बुधवार दिनांक ४ सप्टेंबर पासून होत आहे.
दरम्यान पहाटे तीन च्या सुमारास मंदिर मुक्त द्वार दर्शनासाठी भाविकांसाठी खुले करण्यात येणार असल्याची माहिती देवस्थानचे अध्यक्ष स्वाती पाचुंदकर यांनी दिली.
बुधवार ते शनिवार पर्यंत पहाटेपासून सायंकाळपर्यंत भाविकांना गणपतीच्या मूर्तीला प्रत्यक्ष स्पर्श करून दर्शन घेता येणार आहे. या भाद्रपद महोत्सव दरम्यान विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याचे मुख्य विश्वस्त ओंकार देव यांनी सांगितले.
पारंपरिक प्रथेनुसार भाद्रपद गणेशोत्सवामध्ये श्री महागणपतीच्या चारही दिशांना असलेल्या बहिणींना आणण्यासाठी पालखीद्वारे द्वार यात्रा काढली जाणार असल्याचे उपाध्यक्ष संदीप दौंडकर यांनी सांगितले.
यात्रा काळात भाविकांची गर्दी लक्षात घेऊन भाविकांना विविध सुविधा दिल्या जाणार आहेत यामध्ये भाविकांना दर्शनासाठी व सावलीसाठी भव्य असा मंडप, पिण्याच्या पाण्याची सुविधा, सुसज्ज असे वाहनतळ, हिरकणी कक्ष आदी सुविधा दिल्या जाणार असल्याचे सचिव तुषार पाचुंदकर यांनी सांगितले.
बुधवार दिनांक ४ सप्टेंबर ते मंगळवार दिनांक १० सप्टेंबर या कालावधीमध्ये महागणपती मंदिरामध्ये विविध धार्मिक सांस्कृतिक व पारंपरिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून भाविकांनी त्याचा लाभ घ्यावा असे आव्हान देवस्थानचे खजिनदार विजय देव यांनी केले आहे.





