Ranjanaa Kulkarni : उद्योजिका रंजना कुलकर्णी यांची ‘टिस्का मिसेस इंडिया २०२६’ मध्ये उत्तुंग कामगिरी; पटकावले दोन मानाचे किताब!
मूळच्या सातारा जिल्ह्यातील कराड तालुका येथे राहणाऱ्या उद्योजिका रंजना प्रकाश आमले -कुलकर्णी (Ranjanaa Kulkarni) यांनी देशातील अत्यंत प्रतिष्ठित मानल्या जाणाऱ्या 'टिस्का मिस अँड मिसेस इंडिया २०२६' या राष्ट्रीय सौंदर्य स्पर्धेत आपल्या कौशल्याचा आणि आत्मविश्वासाचा ठसा उमटवला आहे.

Ranjanaa Kulkarni : मूळच्या सातारा जिल्ह्यातील कराड तालुका येथे राहणाऱ्या उद्योजिका रंजना प्रकाश आमले -कुलकर्णी (Ranjanaa Kulkarni) यांनी देशातील अत्यंत प्रतिष्ठित मानल्या जाणाऱ्या ‘टिस्का मिस अँड मिसेस इंडिया २०२६’ या राष्ट्रीय सौंदर्य स्पर्धेत आपल्या कौशल्याचा आणि आत्मविश्वासाचा ठसा उमटवला आहे.
भारताच्या विविध राज्यांतील प्रतिभावान आणि प्रेरणादायी महिलांना मागे टाकत रंजना कुलकर्णी (Ranjanaa Kulkarni) यांनी या स्पर्धेत “मिसेस ब्रँड ॲम्बेसेडर ऑफ महाराष्ट्र” आणि “मिसेस फोटोजेनिक” हे दोन अत्यंत मानाचे किताब आपल्या नावावर केले आहेत. त्यांच्या या यशामुळे पुणे शहरासह संपूर्ण महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
असा होता यशाचा प्रवास
रंजना कुलकर्णी यांचा या स्पर्धेतील प्रवास जानेवारी २०२६ मध्ये अर्ज करण्यापासून सुरू झाला. त्यानंतर फेब्रुवारी २०२६ मध्ये अत्यंत कठीण समजली जाणारी ‘ऑडिओ टेलिफोनिक फेरी’ त्यांनी यशस्वीरित्या पार केली आणि त्यांची अंतिम फेरीसाठी निवड झाली. अंतिम फेरीपूर्वी त्यांना विविध आव्हानात्मक टास्क देण्यात आले होते, ते त्यांनी उत्तम रीतीने पूर्ण केले.
स्पर्धेच्या अंतिम फेऱ्या २८ ते ३१ मे २०२६ या कालावधीत पार पडल्या. या अंतिम सोहळ्यात डान्स राऊंड, नॅशनल कॉस्ट्यूम राऊंड, स्विमवेअर राऊंड आणि बुद्धिमत्तेची कसोटी पाहणारी प्रश्नोत्तर फेरी अशा विविध आव्हानात्मक टप्प्यांचा समावेश होता. या प्रत्येक फेरीत रंजना कुलकर्णी यांनी आपल्या उत्कृष्ट सादरीकरणाने, सर्जनशीलतेने आणि मंचावरील आत्मविश्वासाने परीक्षकांची मने जिंकली.
आत्मविश्वास आणि अंतर्गत शक्ती हेच यशाचे गमक
आपल्या या यशाबद्दल बोलताना उद्योजिका रंजना कुलकर्णी (Ranjanaa Kulkarni) यांनी सांगितले की, त्यांचा आत्मविश्वास, धैर्य आणि स्वतःवरील दृढ विश्वास हेच त्यांच्या या संपूर्ण प्रवासातील सर्वात मोठे पाठबळ ठरले. या भव्य व्यासपीठावर सहभागी होणे हा त्यांच्यासाठी आयुष्य बदलून टाकणारा आणि समृद्ध करणारा अनुभव होता. या प्रवासामुळे त्यांना स्वतःमधील अधिक सक्षम, आत्मविश्वासपूर्ण आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व शोधण्याची संधी मिळाली, तसेच देशभरातील अनेक गुणी महिलांशी संवाद साधून त्यांच्याकडून प्रेरणा घेता आली.
टिस्का टीमचे मानले आभार
“टिस्का मिस अँड मिसेस इंडिया टीमचे मी मनःपूर्वक आभार मानते. या व्यासपीठामुळे मला एका सामान्य व्यक्तीपासून असामान्य व्यक्तिमत्त्वाकडे प्रवास करण्याचा सुंदर अनुभव मिळाला. या प्रवासाने माझ्यातील सर्वोत्तम रूप शोधण्यास मदत केली आणि या अविस्मरणीय आठवणींसाठी मी सदैव ऋणी राहीन,” अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.
भविष्यातील ध्येय आणि महिलांना संदेश
“सौंदर्य हे केवळ बाह्य रूपात नसते; ते आत्मविश्वास, धैर्य आणि इतरांना प्रेरणा देण्याच्या सामर्थ्यात असते,” असा ठाम विश्वास रंजना कुलकर्णी यांनी व्यक्त केला. भविष्यात महाराष्ट्र आणि भारताचे प्रतिनिधित्व अधिक मोठ्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर करण्याचे त्यांचे ध्येय आहे. या व्यासपीठाचा उपयोग त्या महिलांमध्ये आत्मप्रेम, अंतर्गत विकास आणि सर्वांगीण आरोग्य याविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी करणार आहेत.
इतर महिलांना संदेश देताना त्या म्हणाल्या, “प्रत्येक स्त्रीमध्ये अमर्याद क्षमता दडलेली असते. स्वतःवर प्रेम करा, स्वतःची ताकद ओळखा आणि जगाचा आत्मविश्वासाने शोध घ्या. स्वतःवर विश्वास ठेवा आणि सतत प्रगती करत राहा.” एका यशस्वी उद्योजिकेपासून राष्ट्रीय स्तरावरील ब्रँड ॲम्बेसेडर बनण्याचा रंजना कुलकर्णी (Ranjanaa Kulkarni) यांचा हा प्रवास आज सर्वच महिलांसाठी अत्यंत प्रेरणादायी ठरत आहे.







