राणी मुखर्जीच्या आगामी रोलपेक्षा एका वेगळ्या कारणासाठी ती चर्चेत आली आहे. राणीने खारमधील उच्चभ्रू सोसायटीमध्ये 1-4 बीएचके अपार्टमेंट विकत घेतली आहे, असे समजते आहे. तिची अपार्टमेंट टायगर श्रॉफच्या अपार्टमेंटच्या अगदी शेजारीच आहे. गेल्याच महिन्यात ही अपार्टमेंट राणीच्या नावावर रजिस्टर्ड झाली आहे. ही इमारत 22 मजल्यांची असून 3,545 चौरस फुटांचे हे आलिशान घर आहे. मुख्य म्हणजे इथून समुद्राचे विहंगम दृश्य दिसते, ही या अपार्टमेंटची खासियत आहे. याशिवाय बहुमजली पार्किंग, फिटनेस स्टुडिओ, रॉक क्लायम्बिंग झोन आणि आकाश निरीक्षणासाठीचा विशेष व्हरांडादेखील इथे आहे. या आलिशान घरासाठी राणीने तब्बल 7.12 कोटी रुपये मोजले आहेत. राणी सध्या “मिसेस चॅटर्जी व्हर्सेस नॉर्वे’च्या शूटिंगसाठी परदेशात गेली आहे. तिने “बंटी और बबली 2’चे शूटिंगदेखील संपवले आहे. यामध्ये तिच्याबरोबर अभिषेक बच्चनऐवजी सैफ अली खान असणार आहे. तिच्या आगामी सिनेमांमध्ये तिने निर्मिती केलेल्या सिनेमांचीही वर्णी आहे. आता नवरा आदित्य चोप्रामुळे तिला तिच्याकडे निर्मिती क्षेत्राचाही अनुभव जमा झाला आहे.