Rang Panchami 2026 – रंगपंचमीच्या उत्साहात बेफिकीरपणे रंग खेळताना डोळ्यांवर गंभीर परिणाम होऊ शकतात. बाजारात उपलब्ध असलेल्या अनेक रंगांमध्ये रासायनिक व विषारी घटकांचा समावेश असल्याने त्वचा आणि डोळ्यांचे नुकसान होण्याची शक्यता असते. त्यामुळे रंगोत्सव साजरा करताना विशेष काळजी घेणे आवश्यक आहे, असा सल्ला पिंपरी-चिंचवडकरांना प्रसिद्ध नेत्रतज्ज्ञांनी दिला आहे. धुळवडीसाठी वापरल्या जाणाऱ्या काही कृत्रिम रंगांमध्ये कपड्यांना डाईंग करण्यासाठी वापरले जाणारे रसायनांचे मिश्रण असते. मेटल अॅसिड, अल्कली पावडर, काच पावडर यांसारखे घटक त्यात आढळतात. काळ्या रंगात लेड ऑक्साईड, हिरव्या रंगात कॉपर सल्फेट तर लाल रंगात मर्क्युरी सल्फेट यांसारख्या धोकादायक रसायनांचा वापर होतो. हे रंग त्वचेसाठी घातक तर आहेतच; परंतु डोळ्यांसाठी अधिक धोकादायक ठरू शकतात. काही रंगांना चमक आणण्यासाठी काचेची भुकटी, ऍस्बेस्टॉस, चॉक पावडर किंवा सिलिका मिसळली जाते. अशा घटकांमुळे डोळ्यांत जळजळ, सूज आणि गंभीर इजा होऊ शकते. फुगा किंवा दगड लागल्यास तातडीची दक्षता रंगाने भरलेला फुगा वेगाने डोळ्यावर आदळल्यास कॉर्नियाला इजा होण्याचा धोका असतो. गंभीर प्रसंगी रेटिनालाही धक्का बसू शकतो. दगड किंवा कठीण वस्तू लागल्यास दृष्टीवर कायमस्वरूपी परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा वेळी स्वतःच उपाय करण्याऐवजी तातडीने नेत्रतज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. डोळ्यात रंग गेल्यास प्रथम स्वच्छ पाण्याने हलक्या हाताने धुवावे. जळजळ जाणवत असल्यास डोळे चोळू नयेत. परिस्थिती गंभीर वाटल्यास जवळच्या रुग्णालयात त्वरित दाखल व्हावे. दरवर्षी रुग्णांची वाढ रंगपंचमीच्या दुसऱ्या दिवशी डोळ्यांत जळजळ, सूज किंवा दृष्टी धूसर होण्याच्या तक्रारींसह अनेक रुग्ण उपचारासाठी येतात, असे डॉक्टरांनी म्हटले आहे. विशेषतः मुलांमध्ये आणि युवकांमध्ये फुग्यांमुळे डोळ्यांच्या जखमा अधिक प्रमाणात आढळतात. दरवर्षी अशा रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. पिंपरी-चिंचवडसारख्या दाट लोकवस्तीच्या शहरात सार्वजनिक ठिकाणी रंगांचा मारा टाळणे, जबाबदारीने सण साजरा करणे आणि सेंद्रिय रंगांना प्राधान्य देणे, ही काळाची गरज असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. रंगांचा आनंद घेताना आरोग्याचे भान राखल्यासच सण खऱ्या अर्थाने सुखद आणि सुरक्षित ठरेल, असे आवाहन करण्यात आले आहे. साधे उपाय ठरतील प्रभावी -रंग खेळताना साधा चष्मा किंवा गॉगलचा वापर करावा. -डोळ्यात कॉन्टॅक्ट लेन्स वापरणे शक्यतो टाळावे. -डोळ्यांच्या भोवती कोल्ड क्रीम लावल्यास रंग त्वचेवर कमी चिकटतो. -रंग खेळण्यास जाण्यापूर्वी अंगावर तेल लावल्यास रंग लवकर निघतो. -रंग काढताना डोळे घट्ट मिटून कोमट पाण्याचा वापर करावा.