राणे पिता-पुत्रांच्या अडचणीत वाढ; “दिशा सालियन’च्या आईने राष्ट्रपतींना पाठवलं पाच पानी पत्र

मुंबई – दिवंगत अभिनेता सुशांतसिंह राजपुत याची माजी व्यवस्थापिका दिशा सालियन हिच्या संबंधात बदनामीकारक आरोप करणारे केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि त्यांचे आमदार पुत्र नितेश राणे यांच्या वर कारवाई करावी, या मागणीसाठी दिशाच्या आई वडिलांनी राष्ट्रपतींकडे धाव घेतली आहे. त्यांनी राणे पितापुत्रांच्या विरोधात थेट राष्ट्रपतींनाच निवेदन पाठवले आहे.
आपल्या मुलीच्या मृत्यूवरून जे राजकारण केले जात आहे त्याबद्दल तिच्या आई-वडिलांनी खंत व्यक्त केली आहे. खोटे आरोप करून राणे पितापुत्रांनी आमच्या मुलीची व आमचीही जी बदनामी चालवली आहे त्यावरून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. त्यामुळे राणे पितापुत्रांच्या अडचणी वाढल्या आहेत.
दिशाच्या आई वडिलांनी राष्ट्रपतींना पाच पानी पत्र पाठवले आहे. त्यात राणे हे दिशाच्या चारीत्र्यावरही संशय घेत असल्याची तक्रार करण्यात आली आहे. राणेंकडून या प्रकरणात सादर केला जाणारा तपशील किती खोटा आहे याचीही माहिती त्यांनी यात सादर केली आहे.





