Ranbir Kapoor: बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर सध्या त्याच्या आगामी रामायण या चित्रपटामुळे चर्चेत आहे. याच दरम्यान रणबीरने उत्तर प्रदेशातील अयोध्या येथे जमीन खरेदी केल्याची माहिती समोर आली आहे. एका रिअल इस्टेट कंपनीने याबाबत अधिकृत माहिती दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रणबीर कपूरने सुमारे २,१३४ स्क्वेअर फूट जागा खरेदी केली असून या व्यवहाराची किंमत जवळपास ३.३१ कोटी रुपये आहे. ही जमीन ‘द सरयू’ नावाच्या प्रोजेक्टचा भाग आहे. सरयू नदीच्या काठावर विकसित होत असलेल्या या प्रकल्पाचे क्षेत्रफळ सुमारे ७५ एकर आहे. अयोध्येत सध्या मोठ्या प्रमाणात धार्मिक आणि पर्यटन विकास होत असल्याने अनेक मोठ्या सेलिब्रिटींचा या शहराकडे ओढा वाढताना दिसत आहे. या गुंतवणुकीबद्दल बोलताना रणबीर कपूरने एक भावनिक प्रतिक्रिया दिली. तो म्हणाला, “मला वाटतं अयोध्येनेच मला निवडलं आहे. मी फक्त त्या हाकेला प्रतिसाद दिला. अयोध्या आपल्या इतिहासाचा आणि संस्कृतीचा महत्त्वाचा भाग आहे. ‘द सरयू’मधील ही जमीन माझ्या कुटुंबासाठी वारशाचा भाग ठरेल.” रणबीरच्या या वक्तव्याची सोशल मीडियावरही मोठी चर्चा सुरू आहे. Ranbir Kapoor विशेष म्हणजे, अयोध्येत गुंतवणूक करणारा रणबीर कपूर हा पहिला अभिनेता नाही. यापूर्वी ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांनीदेखील अयोध्येत अनेक मालमत्ता खरेदी केल्या आहेत. अहवालानुसार, २०२५ मध्ये त्यांनी सुमारे २५ हजार स्क्वेअर फूट जागा तब्बल ४० कोटी रुपयांत घेतली होती. तसेच ‘द सरयू’ प्रोजेक्टमध्येही त्यांनी सुमारे १४.५ कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. ही मालमत्ता त्यांच्या वडिलांच्या म्हणजेच हरिवंश राय बच्चन यांच्या ट्रस्टच्या नावावर नोंदवण्यात आल्याचे सांगितले जाते. दरम्यान, रणबीर कपूरच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास तो लवकरच नितेश तिवारी दिग्दर्शित ‘रामायण’ चित्रपटात प्रभू रामांच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाचा पहिला भाग दिवाळी २०२६ मध्ये प्रदर्शित होणार असल्याची माहिती आहे. याशिवाय रणबीरकडे ‘लव्ह अँड वॉर’ हा मोठा चित्रपटही आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत आलिया भट्ट आणि विक्की कौशल हे कलाकार झळकणार आहेत. चित्रपटाचे दिग्दर्शन संजय लीला भन्साळी करत आहेत.