पुणे जिल्हा | भीमाशंकर अभयारण्यात सर्रास प्राण्यांची शिकार?

राजगुरूनगर, (प्रतिनिधी) – भीमाशंकर अभयारण्य क्षेत्रातील येळवळी गावातील परिसरामध्ये पाणवठ्यांची संख्या कमी असल्याने वन्यजीवांना पाण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात वणवण करावी लागत आहे. जंगलात जंगली प्राण्यांसाठी पाणवठे कमी असल्याने प्राण्याच्या शिकारीचे प्रमाण वाढले असूनही वनविभागाचे याकडे दुर्लक्ष आहे.
गेल्या 10 वर्षांपासून येळवळी गावातील ग्रामस्थ व वनसमिती अध्यक्ष खंडू बाणेरे यांनी जंगलात पाणवठे तयार करण्यासाठी वनविभागकडे सतत मागणी करत आहे. परंतु वनविभागाचे अधिकारी जाणुन बुजून या मागणीकडे दुर्लक्ष करत आहे.
2018 मध्ये येळवळी गावाच्या परिसरामध्ये दोन भेकर (हरीण) पाण्याच्या शोधात विहिरीत पडून त्यांचा मृत्यू झाल्याची घटना झाली होती. यानंतर ग्रामस्थांनी वनविभागाकडे जंगलात पाणवठे तयार करण्यासाठी मागणी केली होती; परंतू अधिकार्यांनी आजपर्यंत या मागणीकडे दुर्लक्ष केले आहे.
गेल्या दोन वर्षार्ंपासून सतत भीमाशंकर अभयारण्य क्षेत्रामध्ये गॅबियन बंधार्यांची कामे सुरू आहेत. ग्रामस्थ जंगलामध्ये पाणवठे तयार करण्यासाठी विनंती करत आहे. वन विभागाअंतर्गत कोणत्याही प्रकारचे पाणवठे तयार केले नाहीत यामुळे वन्य जीवांना पाणी पिण्यासाठी वणवण करावी लागत आहेत. यामुळे भीमाशंकर अभयारण्य परिसरात वन्यजीव आणि मानव संघर्ष होण्याची शक्यता नाकारता येत नाही यात वन्यजीवांचे अस्तित्व धोक्यात येऊ शकते.
दुर्लक्ष असल्याने चौकशी करा
गेली 3 वर्षापासून भीमाशंकर अभयारण्य क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात गॅबियन बंधारे बांधले जात आहेत; परंतु वनविभाग जंगलात गॅबियन बंधारे सोबत जंगलात पाणवठे तयार करण्याकडे का दुर्लक्ष करत आहेत याबाबत चौकशी करणे खूप गरजेचे आहे अशी मागणी येळवळी ग्रामस्थांनी केली आहे.
या प्राण्यांच्या शिकारीचे अवशेष सापडले
भीमाशंकर अभयारण्यात जंगली प्राण्यांची शिकार होत असल्याचे येळवळी ग्रामस्थांनी सांगितले. सायंदाळ, ससे, रानडुक्कर,भेकर,घोरपड, रानकोंबडी यांच्या शिकारी होत असून सायंदाळ या प्राण्याची जास्त शिकारी होत असून त्याचे अवशेष नागरिकांना आढळून आले आहेत





