Ramesh Vishwashkuma : विमान दुर्घटनेतून वाचलेल्या एकमेव प्रवाशाने सांगितला धक्कादायक प्रसंग?

Ahmedabad Air India Plane Crash : गुजरातमधील अहमदाबाद येथील सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावरून लंडनच्या गॅटविक विमानतळाकडे जाणारी एअर इंडियाची फ्लाइट AI171 (बोइंग 787-8 ड्रीमलाइनर) गुरुवारी (12 जून) दुपारी 1:38 वाजता उड्डाणानंतर अवघ्या पाच मिनिटांत मेघानी नगर परिसरात कोसळली. या भीषण अपघातात 242 प्रवाशांपैकी फक्त एकच जण जिवंत आढळला आहे.
रमेश विश्वासकुमार अपघातातून बचावलेल्या व्यक्तीचे नाव आहे. रमेश विश्वासकुमार यांना दुखापत झाली असली तरी ते अगदी चालत रुग्णवाहिकेपर्यंत गेले. रुग्णालयात आल्यानंतर त्यांनी विमान अपघातावेळी नेमके काय घडलं? याची माहिती दिली आहे.
रमेश विश्वासकुमार हे भारतीय वंशाचे ब्रिटीश नागरिक असून ते आपल्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी भावासोबत भारतात आले होते. त्यांनी सांगितले की, अपघातानंतर मी उठलो तेव्हा माझ्या आजुबाजूला मृतदेहांचा खच पडला होता. मी प्रचंड घाबरलो होतो. मी उठून उभा राहिलो आणि धावायला लागलो. माझ्या अवतीभवती सगळीकडे विमानाचे तुकडे पसरले होते. त्यानंतर काही लोकांनी मला धरले आणि रुग्णालयात आणले, असं रमेश विश्वासकुमार यांनी सांगितलं.
रमेश विश्वासकुमार नेमके कसे वाचले?
या भीषण दुर्घटनेत विमानातील 241 जणांचा मृत्यू झाला. मात्र, एकटे रमेश विश्वासकुमार कसे वाचले, याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे. रमेश विश्वासकुमार हे विमानातील 11ए या आसनावर बसले होते. त्यांचा भाऊ अजय विमानात वेगळ्या रांगेत बसला होता. रमेश विश्वासकुमार हे विमानातील इमर्जन्सी एक्झिटजवळ बसेल होते. त्यामुळे अपघात होतोय असं वाटताच त्यांनी या इमर्जन्सी दरवाजातून उडी टाकली असावी, असा पोलिसांचा अंदाज आहे.
एअर इंडिया कोणाच्या मालकीचे आहे
एअर इंडिया ही भारताची राष्ट्रीय विमान कंपनी आहे, जी सध्या टाटा समूहाच्या मालकीखाली आहे. 1932 मध्ये जे.आर.डी. टाटा यांनी टाटा एअरलाइन्स म्हणून तिची स्थापना केली. 1953 मध्ये भारत सरकारने ती राष्ट्रीयीकृत केली.
ऑक्टोबर 2021 मध्ये, टाटा समूहाने 18,000 कोटी रुपयांना एअर इंडियाला पुन्हा विकत घेतले, ज्यामुळे ती खासगी मालकीची बनली. टाटा समूहाने कंपनीच्या आधुनिकीकरणासाठी आणि सेवा सुधारणेसाठी मोठी गुंतवणूक केली आहे. सध्या एअर इंडियाचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन असून, ती आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत मार्गांवर सेवा पुरवते.

