रमेश कदम 8 वर्षांनंतर जामिनावर बाहेर; अण्णा भाऊ साठे महामंडळ घोटाळा प्रकरण

मुंबई – राष्ट्रवादीचे माजी आमदार रमेश कदम यांची आठ वर्षांनंतर अखेर जामीनावर सुटका झाली आहे. अण्णा भाऊ साठी महामंडळ कथित घोटाळ्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला होता. न्यायालयाने जामीन मंजूर केल्यानंतर रविवारी ठाणे सेंट्रल जेलमधून त्यांची सुटका करण्यात आली.
कदम यांच्यावर अण्णा भाऊ साठे महामंडळामध्ये 312 कोटी रुपयांच्या घोटाळा केल्याचा आरोप आहे. त्या प्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल केल्यानंतर त्यांची रवानगी तुरुंगात करण्यात आली होती. रविवारी जामिनावर बाहेर आल्यानंतर त्यांच्या समर्थकांनी जल्लोष केला.
“गेली आठ वर्षे ज्या माध्यमातून माझ्यावर आरोप झाले त्या आरोपांना मी सामोरे गेलो,
न्यायालयाच्या चार्जशिटमध्ये जे आरोप होते त्यावर विचार करून मला जामीन दिला त्याबद्दल उच्च न्यायालय आणि सत्र न्यायालयाचा मी मनापासून आभारी आहे. माझ्यावर करण्यात आलेले आरोपांमध्ये तथ्य नाही. अण्णाभाऊ साठे महामंडळाच्या माध्यमातून जो पैसा वाटला गेला तो कर्जरूपाने होता, तो आज ना उद्या मिळेल, ते कर्ज आहे, भ्रष्टाचार नाही.
आता पुलाखालून बरंच राजकीय पाणी वाहून गेले आहे. त्यामुळे माझ्या मूळ विधानसभा मतदारसंघाचा मला अजून अंदाज नाही. मी येत्या काही दिवसांत माझ्या मतदारसंघात जाणार आहे. माझ्या मतदारांशी बोलणार आहे. मगच सर्व राजकीय अंदाज घेऊन माझी भूमिका स्पष्ट करून निर्णय घेणार असल्याचे कदम यांनी बाहेर पडल्यानंतर म्हटले आहे.
तुरुंगातही वादात
दरम्यानच्या काळात या ना त्या कारणाने कदम सतत चर्चेत राहिले आहेत. मागे एका व्हिडीओ क्लीपमध्ये कदम आर्थर रोड जेलमध्ये कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसांना शिवीगाळ करत असल्याचे दिसले होते. त्यासंदर्भात कदम यांच्याविरोधात नागपाडा पोलिस स्टेशनमध्ये गुन्ह्यांची नोंद करण्यात आली.
मात्र, “पोलिसांनीच मला जातीवाचक शिवीगाळ केली आणि 25 हजारांची लाच मागितली’ असा त्यांचा दावा होता. तसेच भायखळा जेलमध्ये असताना वॉर्डन मंजुळा शेट्ये हत्या प्रकरणातही कदम यांनी पोलिसांवर आरोप केले होते.





