Ramesh Chennithala : निकालावर आमचा विश्वास नाही; काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथलांचा आरोप

मुंबई : राज्यातील काँग्रेसच्या 100% जिंकून येणाऱ्या उमेदवारांचा पराभव कसा होऊ शकतो? असा प्रश्न काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चन्नीथला यांनी उपस्थित केला आहे. महाराष्ट्राच्या जनतेवर आमच्या विश्वास आहे. त्यामुळे या निकालावर आमचा विश्वास नसल्याचे त्यांनी त्यांनी म्हटले आहे. हा निकाल अनपेक्षित आहे. कुणालाच त्यावर विश्वास बसत नसल्याचा दावा देखील त्यांनी केला.
काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा पराभव झाला, आमचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांचा देखील पराभव झाला. त्यामुळे या निकालावर आम्ही अभ्यास करून नंतर जनतेसमोर जाणार असल्याचे चेन्नीथला यांनी म्हटले आहे. राज्यातील काही विभागांमध्ये तर आमची एकही जागा आली नाही, असे देखील चेन्नीथला यांनी म्हटले आहे. या निकालावर त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
राज्यामध्ये काँग्रेसच्या प्रभावानंतर आता त्याची जबाबदारी ही आपण घेत असल्याचे चेन्नीथला यांनी म्हटले आहे. लोकसभा निवडणुकीत जबाबदारी माझ्यावर होती. तसेच विधानसभा निवडणुकीतही जबाबदारी माझ्यावर होती, त्यामुळे या पराभवाची जबाबदारी देखील आपण घेत असल्याचे रमेश चन्नीथला यांनी म्हटले आहे. मात्र या निकालावर आमचा विश्वास बसत नसल्याचे देखील ते म्हणाले.
नाना पटोले यांच्या मतदारसंघांमध्ये मी हजारो नागरिकांशी स्वतः बोललो आहे. त्या सर्वांनी नाना पटोले हजारो मतांनी विजयी होतील, असा विश्वास व्यक्त केला होता. मात्र या मतदार संघातील हा निकाल हा अनपेक्षित असल्याचा दावा देखील चेन्नीथला यांनी केला आहे.





