Ramesh Chennithala : मुख्यमंत्रिपदाने हुलकावणी दिल्याने काँग्रेस नेते रमेश चेन्निथला नाराज; पक्षाकडून मनधरणीचे प्रयत्न सुरु
केरळच्या मुख्यमंत्रिपदाने हुलकावणी दिल्याने कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते रमेश चेन्निथला (Ramesh Chennithala) यांची नाराजी कायम आहे. ती दूर करण्यासाठी चेन्निथला यांच्या मनधरणीचे प्रयत्न पक्षाकडून केले जात आहेत.

Ramesh Chennithala : केरळच्या मुख्यमंत्रिपदाने हुलकावणी दिल्याने कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते रमेश चेन्निथला (Ramesh Chennithala) यांची नाराजी कायम आहे. ती दूर करण्यासाठी चेन्निथला यांच्या मनधरणीचे प्रयत्न पक्षाकडून केले जात आहेत.
कॉंग्रेसने मुख्यमंत्रिपदाचा सस्पेन्स संपवत गुरूवारी व्ही.डी.सतीशन यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले. त्या पदाच्या प्रमुख दावेदारांमध्ये के.सी.वेणुगोपाल आणि ७० वर्षीय चेन्निथला यांचा समावेश होता.
सतीशन यांना मुख्यमंत्री बनवण्याचा पक्षाचा निर्णय वेणुगोपाल यांनी स्वीकारला. मात्र, चेन्निथला यांची नाराजी दडून राहिली नाही. त्यांनी जाहीर वक्तव्य टाळले असले तरी त्यांचे मौन, त्यांच्या कृती ते नाराज असल्याचे दर्शवणाऱ्या आहेत.
मुख्यमंत्री म्हणून नाव घोषित झाल्यानंतर सतीशन यांची विधिमंडळ पक्षनेतेपदी एकमताने निवड करण्यात आली. मात्र, गुरूवारी झालेल्या त्या बैठकीपासून चेन्निथला दूर राहिले. अनुभवी आणि महत्वाचे नेते असल्याने चेन्निथला यांच्या नाराजीची दखल कॉंग्रेसच्या वरिष्ठ पातळीवरून घेण्यात आली. त्यानंतर पक्षाच्या काही नेत्यांनी त्यांच्याशी संपर्क साधला.
स्वत: सतीशन यांनीही चेन्निथला यांची भेट घेतली. मुख्यमंत्री निश्चित झाल्याने कॉंग्रेसच्या नेतृत्वाखालील आघाडीने (यूडीएफ) नव्या सरकारची रचना करण्याच्या हालचाली सुरू केल्या. मंत्रिपदांचे वाटप करण्याच्या उद्देशातून त्या आघाडीतील घटक पक्षांची शुक्रवारी बैठक झाली. मात्र, त्या बैठकीलाही चेन्निथला गैरहजर राहिले.
त्यामुळे तर्क-वितर्कांना उधाण आले आहे. नव्या मंत्रिमंडळात चेन्निथला यांचा समावेश होणार का, ते मंत्रिपद स्वीकारणार का या प्रश्नांभोवती चर्चांनी फेर धरला आहे. नवे मुख्यमंत्री सतीशन यांचा शपथविधी सोमवारी होणार आहे. त्यावेळी मंत्रिमंडळातील इतर सर्व मंत्रीही शपथ घेणार असल्याचे समजते.






