Ramdas Athawale : “उद्धव-राज ठाकरेंचे राजकारण संपले” – रामदास आठवले

Ramdas Athawale – शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व मनसे अध्यक्ष राज ठाकरे या दोघांचेही राजकारण संपले आहे. त्यामुळे ते एकत्र आले तरी त्याचा युतीला कोणताही फटका होणार नाही, असा दावा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केला आहे.
आठवले यांनी सोलापूर दौऱ्यात पत्रकारांशी वार्तालाप करताना हा दावा केला आहे. यावेळी रिपाइं (आ.) चे प्रदेशाध्यक्ष राजा सरवदे, के डी कांबळे, सुशील सरवदे आदी नेते उपस्थित होते. आठवलेंनी शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हेंच्या वादग्रस्त विधानावरही भाष्य केले.
ते म्हणाले, उद्धव ठाकरे यांच्याकडे काही गाड्यांची कमतरता आहे का? ते इतक्या गाड्या काय करतील? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. पण या प्रकरणी नीलम गोऱ्हे यांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना कुणीही असंसदीय शब्दांचा वापर करू नये. महिलांना अपमानकारक वाटेल असे बोलू नये, असे ते म्हणाले.
रिपाईला चांगल्या जागा मिळतील
आठवलेंनी यावेळी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आरपीआयला सन्मानजनक जागा देण्याचीही मागणीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली. आम्ही महायुतीकडे एक एमएलसी व एका मंत्रिपदाची मागणी केली होती. ही मागणी आमच्या कार्यकर्त्यांसाठी करण्यात आली होती.
आता महामंडळांवर माझे कार्यकर्ते दिसतील. ऑक्टोबर महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक होण्याची शक्यता आहे. त्यात आरपीआयला चांगल्या जागा सुटतील. आमची तशी चर्चा झाली आहे, असे ते म्हणाले.





