Ramdas Athawale : मी ज्यांच्यासोबत जातो, त्यांची सत्ता येते ; पौडमध्ये रामदास आठवलेंची खास शैलीत राजकीय फटकेबाजी

प्रभात वृत्तसेवा
पौड – पौड (ता. मुळशी) येथे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) जनसेवा कार्यालयाचे उदघाटन करण्यात आले. या प्रसंगी त्यांनी त्यांच्या ओळखीच्या खास विनोदी शैलीत विरोधकांना टोला लगावला.मी ज्यांच्या सोबत जातो, त्यांची सत्ता येते. आणि ज्यांच्यासोबत जात नाही, त्यांना सत्तेच्या बाहेर राहावं लागतं. मी अनेकांना सत्तेत आणलं, पण मला सत्तेची हौस नाही, असे वक्तव्य करून आठवले यांनी उपस्थितांत हशा पिकवला.
तसेच आरपीआयचे युवा नेते विशाल भीमराव शेळके यांना पंचायत समितीत निवडून आणण्याचे आवाहनही त्यांनी केले. कार्यक्रमाला भोर विधानसभा मतदारसंघाचे आमदार शंकर मांडेकर उपस्थित होते. ते म्हणाले, आठवले प्रचाराला येऊ शकले नाहीत; मात्र त्यांनी माझ्यासाठी स्वतःचा व्हिडीओ संदेश पाठवला, ज्यामुळे माझ्या विजयात मोठा हातभार लागला. उरावडे येथील पोतनीस वाड्यात, जिथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर काही महिने वास्तव्यास होते, तिथे स्मारक उभारणीसाठी प्रयत्न सुरू आहेत. या कार्यात केंद्रीय मंत्री आठवले यांचा हातभार लागेल, अशी अपेक्षा आहे.
कार्यक्रमात आयोजक विशाल शेळके यांच्या वतीने हभप चंद्रकांत महाराज वांजळे यांच्या कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते. तसेच 1,000 अंध बांधवांना पांढर्या काठ्यांचे वितरण आणि विद्यार्थ्यांना संविधान प्रत असलेली परीक्षा पॅड वाटप करण्यात आले.यावेळी रिपाइृचे प्रदेश सचिव सूर्यकांत वाघमारे, संघटक सचिव परशुराम वाडेकर, युवक अध्यक्षशैलेश चव्हाण, युवक संघटक उमेश कांबळे, जिल्हाध्यक्ष श्रीकांत कदम, तहसीलदार विजयकुमार चोबे, पोलीस निरीक्षक संतोष गिरिगोसावी, तालुकाध्यक्ष
अशोक कांबळे, पेरीविंकल इंग्लिश मिडीयम स्कूलचे राजेंद्र बांदल, अविनाश बलकवडे, सचिन खैरे, अमित कंधारे, लहू चव्हाण, माऊली कांबळे, चंदा केदारी, बाळासाहेब भागवत, लक्ष्मण भालेराव, कुणाल वावळकर, विश्वनाथ जाधव, कालिदास गोपालघरे, चंद्रकांत धुराने, सुनील वाडकर, प्रवीण ओहाळ, निलेश आल्हाट, विशाल शेलार, आकाश शेलार, गोविंद निकाळजे, विविध राजकीय व सामाजिक क्षेत्रातील मान्यवर तसेच बहुसंख्य अंध बांधव उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेश मारणे यांनी केले.





