मुंबई : विधानसभा निवडणुकीनंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट होऊ शकते, असा दावा केंद्रीय मंत्री आणि रिपाइंचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी केला आहे. महायुतीच्या जागावाटपात मित्र पक्ष असलेल्या रिपाइं पक्षाच्या वाट्याला जागा न आल्याने रामदास आठवले नाराज झाले आहेत. त्यांनी आज पत्रकार परिषद घेऊन आपली नाराजी उघडपणे बोलून दाखवली. यासोबतच आठवले यांनी उद्धव ठाकरे यांना महायुतीसोबत येण्याची ऑफरही दिली आहे. रामदास आठवले म्हणाले की, मी आणि माझ्या पक्षातील अनेक कार्यकर्ते नाराज आहेत, आमचा पक्ष छोटा जरी असला तरी जागा हव्या होत्या. मागे फडणवीसांना पत्र लिहून किमान 5 जागा देण्याची मागणी केली होती. मात्र, जागा मिळाल्या नाहीत. त्यामुळे उमदेवारी अर्ज दाखल करण्यासाठी जाणार नसल्याचे कार्यकर्ते म्हणत आहेत. रामदास आठवले म्हणाले की, 2012 मध्ये भाजपसोबत आलो. आज आरपीआय कुठेच दिसत नाही. मी त्यांच्याकडे नाराजी व्यक्त केली आहे. धारावी किंवा चेंबूरच्या जागेसाठी आम्ही आग्रही होतो. महामंडळाची देखील मागणी केली आहे. जिल्हा परिषद, महापालिकेसंदर्भात देखील चर्चा झाली आहे. आरपीआयला डावलून चालणार नाही. आम्हाला सत्तेत वाटा मिळाला पाहिजे. मी महायुतीच्या बाजूने आहे. मी केंद्रात मंत्री असल्याने इतर राज्यात देखील पक्षाच्या जागा वाढवतो, त्यामुळे आम्हाला जागा मिळाल्या पाहिजेत, असे आठवले म्हणाले.