रमजान ईद उत्साहात साजरी; हजारो मुस्लिम बांधवांनी केली सामुदायिक नमाज अदा

नगर – शहरात रमजान ईद (ईद-उल-फित्र) शनिवारी (दि.22) उत्साहात व शांततेत पार पडली. सकाळी 10 वाजता ईदची सामुदायिक नमाज कोठला येथील ईदगाह मैदानात पार पडली. मौलाना नदिम अख्तर यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या नमाजसाठी शहरातील मुस्लिम बांधव हजारोंच्या संख्येने उपस्थित होते.
रमजान महिन्याच्या 29 उपवासनंतर शुक्रवारी संध्याकाळी चंद्रदर्शन झाल्याने शनिवारी ईद सर्वत्र उत्साहात साजरी करण्यात आली. तसेच शहरातील विविध भागातील मशिदमध्ये सकाळी 7 वाजल्यापासून 10:20 वाजे पर्यंत ईदच्या नमाजची व्यवस्था करण्यात आली होती. अनेक मशिदमध्ये मुस्लिम भाविकांनी नमाज अदा केली.
ईद शांततेत होण्यासाठी पोलीस प्रशासनाच्या वतीने ईदगाह मैदान व शहरातील विविध भागात चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. कोठला येथून जाणारी वाहतूक दुसर्यामार्गाने वळविण्यात आली होती. नमाजनंतर जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्हाधिकारी सिध्दाराम सालीमठ व पोलीस प्रशासनाच्या वतीने जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी मुस्लिम बांधवांना गुलाबपुष्प वाटून ईदच्या शुभेच्छा दिल्या.
यावेळी शुभेच्छा देण्यासाठी विविध धर्माचे धर्मगुरु, सामाजिक कार्यकर्ते, पोलीस अधिकारी, राजकीय नेते उपस्थित होते. नमाजनंतर शहरातील विविध कब्रस्तान व दर्गामध्ये भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. घरोघरी शीरखुर्मा, गुलगुले व बिर्याणीचा बेत होता. शहरात दिवसभर मुस्लिम बांधवांसह इतर समाजबांधवांनी एकमेकांना भेटून ईदच्या शुभेच्छा देत होते. ईदनिमित्त शहरात सामाजिक एकतेचे दर्शनही घडले.





