Eid Namaaz : ईदच्या दिवशी सार्वजनिक नमाज पठण करण्यावर बंदी; ‘या’ देशाने घेतला मोठा निर्णय
यंदा ईदची नमाज (Eid Namaaz) मोकळ्या मैदानात किंवा रस्त्यावर अदा करण्यास मनाई करण्यात आली असून, सर्व मुस्लिम बांधवांनी फक्त मशिदींमध्ये जाऊन नमाज अदा करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

Eid Namaaz : संयुक्त अरब अमिरात (UAE) मध्ये ईद-उल-फितर सणाच्या निमित्ताने एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. यंदा ईदची नमाज (Eid Namaaz) मोकळ्या मैदानात किंवा रस्त्यावर अदा करण्यास मनाई करण्यात आली असून, सर्व मुस्लिम बांधवांनी फक्त मशिदींमध्ये जाऊन नमाज अदा करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
यूएईच्या जनरल अथॉरिटी ऑफ इस्लामिक अफेयर्स, एंडोमेंट्स अँड झकातने ही घोषणा (Eid Namaaz) सोशल मीडिया आणि अधिकृत माध्यमांद्वारे केली आहे. हा निर्णय नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आणि मोठ्या गर्दीच्या व्यवस्थापनासाठी घेण्यात आला आहे.
इराण-अमेरिका-इस्रायल युद्धाची तीव्रता
फेब्रुवारी २०२६ मध्ये अमेरिका आणि इस्रायल यांनी इराणवर आकस्मिक हवाई हल्ले सुरू केल्यापासून इराण युद्ध सुरू झाले आहे. या युद्धात इराणने प्रत्युत्तरादाखल इस्रायल, अमेरिकन लष्करी तळ आणि आखाती देशांवर क्षेपणास्त्रे आणि ड्रोन हल्ले केले आहेत.
UAE, सौदी अरेबिया, कतार, कुवेत, बहारीन आणि ओमानसह सर्व GCC देशांवर हल्ले झाले असून, UAE वर सर्वाधिक (१,९४६ पेक्षा जास्त) क्षेपणास्त्रे आणि ड्रोन हल्ले झाल्याची नोंद आहे.
इराणने कतारमधील रास लफान इंडस्ट्रियल सिटी (Ras Laffan) वर हल्ला केला, जो जगातील सर्वात मोठे LNG (Liquefied Natural Gas) निर्यात केंद्र आहे. यामुळे मोठे नुकसान झाले असून, जागतिक ऊर्जा पुरवठ्यावर परिणाम होत आहे.
UAE मधील अमेरिकन लष्करी तळ, विमानतळ, हॉटेल्स आणि तेल-गॅस प्रकल्पांनाही लक्ष्य करण्यात आले आहे. दुबईसारख्या सुरक्षित शहरांमध्येही ड्रोन अवशेष पडल्याने किरकोळ नुकसान आणि जीवितहानीची भीती निर्माण झाली आहे. UAE ची एअर डिफेन्स सिस्टम सतत सक्रिय असून, अनेक हल्ले हवेतच रोखले जात आहेत, तरीही धोका कायम आहे.
ईद नमाजीसाठी मशिदींमध्ये मर्यादा का?
परंपरेनुसार, आखाती देशांमध्ये ईद-उल-फितरची नमाज मोठ्या मोकळ्या मैदानात एकत्रितपणे अदा केली जाते. मात्र, सध्याच्या युद्ध परिस्थितीत मोठ्या गर्दीचे मैदान हे संभाव्य लक्ष्य ठरू शकते. ड्रोन किंवा क्षेपणास्त्र अवशेष पडण्याचा धोका, हवाई हल्ल्याची शक्यता आणि सुरक्षा व्यवस्था यामुळे UAE प्रशासनाने ही कठोर पावले उचलली आहेत.
- नमाज फक्त मशिदींमध्ये अदा करावी.
- मोकळ्या मैदानातील ईद प्रार्थना स्थळे बंद ठेवण्यात येणार.
- नागरिकांनी जवळच्या मशिदीत लवकर पोहोचावे आणि अधिकृत मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करावे.
हा निर्णय केवळ UAE पुरता मर्यादित नसून, कुवेत आणि कतारसारख्या इतर आखाती देशांमध्येही समान मार्गदर्शक तत्त्वे लागू करण्यात आली आहेत. युद्धामुळे ऊर्जा पुरवठा, विमान वाहतूक आणि आर्थिक क्रियाकलाप प्रभावित झाले असून, ईदसारख्या सणाच्या वेळी मोठ्या जमाव टाळणे आवश्यक ठरले आहे.
इस्लामिक देशांची बैठक
अलीकडेच सौदी अरेबियाच्या रियाध येथे अरब आणि इस्लामिक देशांची बैठक झाली. यात इराणच्या हल्ल्यांचा एकत्रित निषेध करण्यात आला. सौदी परराष्ट्रमंत्री फैसल बिन फरहान अल साउद यांनी सांगितले की, देशाच्या सुरक्षितता आणि आर्थिक हितसंबंधांच्या रक्षणासाठी लष्करी कारवाईचा अधिकार आहे. खाडी प्रदेशातील तणाव वाढला असून, ईदच्या निमित्तानेही लोकांना सुरक्षित ठिकाणी राहून इबादत (Eid Namaaz) करण्याचे आवाहन केले जात आहे.






