Ram Mandir : 22 जानेवारीला रामललाच्या चरणी तब्बल ‘इतक्या’ कोटींचे दान; आकडेवारी आली समोर

Ram Mandir : सोमवारी 22 जानेवारी रोजी अयोध्येतील राम मंदिरात प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडला. यावेळी संपूर्ण देशातील वातावरण राममय झालं होतं. यावेळी सगळीकडे राम भक्तांचा मोठा उत्साह पाहायला मिळाला. सोशल मीडियावर देखील अनेक व्हिडिओ आणि फोटो व्हायरल होत असल्याचं चित्र दिसून आलं.
संपूर्ण देश राम भक्तीत तल्लीन झाला होता. यावेळी अयोध्येत राम भक्तांचा मोठा सागर पाहायला मिळाला होता. लाखोंच्या संख्येने लोक अयोध्येत दाखल झाले होते आणि आता देखील रामललाच्या दर्शनासाठी येत आहेत.
यावेळी प्राण प्रतिष्ठेला पोहोचलेल्या देशभरातील सेलिब्रिटींनी श्री रामाच्या नवीन मंदिरासाठी उदार हस्ते देणगी दिली. श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टने ही रक्कम जोडली तेव्हा 22 जानेवारीला मिळालेल्या देणग्यांचा आकडा 3 कोटी 17 लाखांवर पोहोचला. मात्र, या रकमेत रामभक्तांनी थेट तीर्थक्षेत्राच्या खात्यावर ऑनलाइन पाठवलेल्या रकमेचा समावेश नाही.
सर्वसामान्य भक्तांनीही भरघोस देणगी दिली.
मात्र, 22 जानेवारीला अयोध्येत रामललाचे दर्शन सर्वसामान्यांसाठी बंद करण्यात आले होते. दुसऱ्या दिवशी 23 जानेवारीला दर्शनाला सुरुवात होताच श्रद्धेचा ओघ निर्माण झाला आणि दर्शन घेतलेल्या सर्वसामान्य भाविकांनीही रामललाच्या चरणी मनोभावे दान अर्पण केले. या दिवशीही रामललाच्या चरणी 10 लाख रुपये अर्पण करण्यात आले. यामध्ये राम भक्तांचे ऑनलाइन पेमेंट आणि खात्यात जमा झालेल्या रकमेचाही समावेश नाही.
मंदिरासाठी देणगीदारांची कमतरता नाही.
वास्तविक, राम मंदिराच्या पायाभरणीबरोबरच भाविकांनी दानाची प्रक्रिया सुरू केली होती. मंदिराचे बांधकाम सुरू झाल्यानंतर श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र कार्यालयात दररोज लाखो रुपयांपर्यंतची रक्कम जमा होऊ लागली. ऑनलाइन पाठवलेल्या रकमेचा डेटाही यामध्ये समाविष्ट केलेला नाही.





