Ram Charan: दाक्षिणात्य अभिनेता राम चरण याच्या आगामी ‘पेद्दी’ या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. ट्रेलर लॉन्च कार्यक्रमात राम चरणने बॉलिवूडमधील सुपरस्टार सलमान खान आणि आमिर खान यांचे खास आभार मानले. ‘सुलतान’ आणि ‘दंगल’सारख्या क्रीडापटांवर आधारित चित्रपटांनी भारतीय सिनेमात स्पोर्ट्स ड्रामासाठी नवा मार्ग तयार केला, असे राम चरणने सांगितले. कार्यक्रमात बोलताना राम चरण म्हणाला की, “सर्वप्रथम सलमान सर आणि आमिर सर यांचे आभार. त्यांनी ‘सुलतान’ आणि ‘दंगल’सारखे चित्रपट करून अशा प्रकारच्या कथांना प्रेक्षकांची पसंती मिळवून दिली. त्यामुळे आमच्यासारख्या कलाकारांना अशा विषयांवर काम करण्याचा आत्मविश्वास मिळाला.” Dangal राम चरणने ‘पेद्दी’ चित्रपटाच्या निर्मितीप्रक्रियेबद्दलही अनेक गोष्टी सांगितल्या. त्याने दिग्दर्शक बुची बाबू सना यांचे विशेष कौतुक केले. तो म्हणाला की, “एकदा दिग्दर्शक माझ्या घरी आले होते. ते जमिनीवर बसून मला पूर्ण कथा सांगत होते. जवळपास दोन तास चाळीस मिनिटे मी फक्त त्यांचे बोलणे ऐकत होतो. कथा ऐकल्यानंतर मला समजले की हा चित्रपट शारीरिकदृष्ट्या खूप मेहनतीचा असणार आहे. पण कथेतली ताकद पाहून मी लगेच तयार झालो.” राम चरणच्या मते, ‘पेद्दी’ ही फक्त स्पोर्ट्स ड्रामा फिल्म नाही, तर स्वतःची ओळख शोधणाऱ्या एका व्यक्तीची भावनिक कथा आहे. “प्रत्येक माणसाला आयुष्यात स्वतःची ओळख हवी असते. हा चित्रपट अशाच एका व्यक्तीचा प्रवास दाखवतो,” असेही त्याने सांगितले. Sultan या चित्रपटात जान्हवी कपूर, बोमन इराणी आणि दिव्येंदू शर्मा हे कलाकारही महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. ट्रेलरमध्ये राम चरणचा दमदार आणि हटके अंदाज पाहायला मिळत असून प्रेक्षकांमध्ये चित्रपटाबद्दल उत्सुकता वाढली आहे. ‘पेद्दी’ हा तेलुगू चित्रपट येत्या ४ जून रोजी सिनेमागृहांत प्रदर्शित होणार आहे. स्पोर्ट्स, संघर्ष आणि भावनांचा संगम असलेला हा चित्रपट प्रेक्षकांना किती भावतो, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.