कोल्हापुरात दगडफेक, जाळपोळीच्या घटनेने एकच गोंधळ, दोन गट एकमेकांना भिडले, पोलिसही जखमी…

Kolhapur Violence | कोल्हापुरातील सिद्धार्थनगर परिसरात कमानीसमोर लावलेल्या फलक आणि झेंड्यावरून दोन गटांत तुफान राडा झाला. शुक्रवारी रात्री उशिरा एका जमावाने सिद्धार्थनगर राजेबागस्वार भागात घुसून दगडफेक आणि वाहनांची तोडफोड केली. या घटनेमुळे परिसरात एकच गोंधळ निर्माण झाला होता. या चौकातील झेंडा फाडल्याच्या अफवेने या गोंधळात आणखी भर पडली.
या घटनेची माहिती मिळताच लक्ष्मीपुरी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी जमावाला पांगवण्याचा प्रयत्न केला. यावेळी जमावाने पोलिसांवर देखील प्रतिहल्ला केला. या हल्ल्यात काही पोलीस आणि स्थानिक नागरिक असे १० जण जखमी झाल्याची माहिती आहे. तीन तासांनंतर परिस्थिती नियंत्रणात आणण्यात पोलिसांना यश आले. तसेच पोलिसांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे. Kolhapur Violence |
नेमक काय घडलं?
मिळालेल्या माहितीनुसार, सिद्धार्थनगर कमानीजवळ काल दुपारी एका मंडळाने वर्धापन दिनाचा फलक उभा केला होता. त्याठिकाणी ध्वनिक्षेपक जोडण्यासह विद्युत रोषणाई करण्याची तयारी सुरू होती. सिद्धार्थनगर येथील स्वागत कमानीजवळ साऊंड लावल्याने संपूर्ण रस्ता व्यापला होता. यामुळे सिद्धार्थ नगरमधील काही नागरिकांनी पोलिसांकडे याबाबत विचारणा केली. त्यानंतर पोलिसांनी ही साऊंड सिस्टीम बंद करायला लावली आणि सिस्टीमचे साहित्यही ताब्यात घेतले.
पोलिसांनी समज देऊनही संबंधित मंडळाच्या कार्यकर्त्यांनी राजकीय नेत्यांची छायाचित्रे असलेला मोठा फलक सिद्धार्थनगर कमानीजवळ उभा केला. ध्वनिक्षेपक लावून त्यासमोर नाचण्याचा काहींनी प्रकार सुरू केला. त्याचबरोबर समोरील एका खांबावरील फलाकाला हार घालून दुसऱ्या गटाला चितावणी देण्याचा प्रकार करण्यात आला.
त्यानंतर रात्री पावणेदहाच्या सुमारास सिद्धार्थनगरात काही तरुणांचा जमाव शिरला. या जमावाने दिसेल त्या वाहनांची तोडफोड सुरू केली. दगडफेक केलीया आणि वाहनेही जाळली. यानंतर पोलिसांनी लाठीमार करत जमावाला नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, दोन्ही बाजूंनी जमाव आक्रमक होता. Kolhapur Violence |
या घटनेनंतर स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग, राखीव पोलिस दल, दंगल काबू पथक असा सुमारे तीनशे पोलिसांचा फौजफाटा सिद्धार्थनगर चौकात तैनात होता. त्यामुळे या परिसराला पोलिस छावणीचे स्वरूप आले होते. यानंतर लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली. सध्या परिसरात शांततेचे वातावरण असल्याची माहिती समोर येत आहे.
हेही वाचा :





