Kolhapur Violence | कोल्हापुरात दोन गटात वाद; रोहित पवार म्हणाले, तुम्हाला विनंती आहे ज्या भूमीत …

Kolhapur Violence | कोल्हापुरातील सिद्धार्थनगर परिसरात कमानीसमोर लावलेल्या फलक आणि झेंड्यावरून दोन गटांत तुफान राडा झाला. शुक्रवारी रात्री उशिरा एका जमावाने सिद्धार्थनगर राजेबागस्वार भागात घुसून दगडफेक आणि वाहनांची तोडफोड केली. या घटनेमुळे परिसरात एकच गोंधळ निर्माण झाला होता. या चौकातील झेंडा फाडल्याच्या अफवेने या गोंधळात आणखी भर पडली.
दरम्यान, या घटनेनंतर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी कोल्हापूरकरांना विनंती केली आहे. म्हणाले ज्या भूमीत आपण जन्मलो, त्या पवित्र भूमिला, विचारांना कोणतंही गालबोट लागू नये याची दक्षता घेण्याची जबाबदारी आपलीच आहे. कुणाच्याही चिथावणीला बळी न पडता शांतता राखून कोल्हापूरच्या भूमीचा सन्मान कायम राखावा, असं रोहित पवार म्हणाले.
नेमकं काय म्हणाले रोहित पवार?
राजर्षी शाहू महाराजांच्या आणि पुरोगामी विचारांना जन्म देणाऱ्या कोल्हापूरच्या भूमीत दोन गटात वाद, संघर्ष होत असेल हे अत्यंत दुर्दैवी आहे. विचारांसाठी संपूर्ण देशाच्या नजरा या पुरोगामी विचारांच्या कोल्हापूरकडं कायम असतात. कोल्हापूरमध्ये आजपर्यंत कधीही न घडलेल्या अशा घटना अलीकडच्या काळात वारंवार का होतात, याचा बारकाईने विचार करण्याची गरज असल्याचे रोहित पवार म्हणाले.
तसेच माझी कोल्हापूरकरांनाही विनंती आहे की, आपण ज्या भूमीत जन्मलो त्या पवित्र भूमिला, विचारांना कोणतंही गालबोट लागू नये याची दक्षता घेण्याची जबाबदारी आपलीच असल्याने कुणाच्याही चिथावणीला बळी न पडता शांतता राखून कोल्हापूरच्या भूमीचा सन्मान कायम राखावा, असंही रोहित पवार यांनी म्हंटले आहे.
काय आहे प्रकरण?
मिळालेल्या माहितीनुसार, सिद्धार्थनगर कमानीजवळ काल दुपारी एका मंडळाने वर्धापन दिनाचा फलक उभा केला होता. त्याठिकाणी ध्वनिक्षेपक जोडण्यासह विद्युत रोषणाई करण्याची तयारी सुरू होती. सिद्धार्थनगर येथील स्वागत कमानीजवळ साऊंड लावल्याने संपूर्ण रस्ता व्यापला होता. यामुळे सिद्धार्थ नगरमधील काही नागरिकांनी पोलिसांकडे याबाबत विचारणा केली. त्यानंतर पोलिसांनी ही साऊंड सिस्टीम बंद करायला लावली आणि सिस्टीमचे साहित्यही ताब्यात घेतले.
पोलिसांनी समज देऊनही संबंधित मंडळाच्या कार्यकर्त्यांनी राजकीय नेत्यांची छायाचित्रे असलेला मोठा फलक सिद्धार्थनगर कमानीजवळ उभा केला. ध्वनिक्षेपक लावून त्यासमोर नाचण्याचा काहींनी प्रकार सुरू केला. त्याचबरोबर समोरील एका खांबावरील फलाकाला हार घालून दुसऱ्या गटाला चितावणी देण्याचा प्रकार करण्यात आला.
त्यानंतर रात्री पावणेदहाच्या सुमारास सिद्धार्थनगरात काही तरुणांचा जमाव शिरला. या जमावाने दिसेल त्या वाहनांची तोडफोड सुरू केली. दगडफेक केलीया आणि वाहनेही जाळली. यानंतर पोलिसांनी लाठीमार करत जमावाला नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, दोन्ही बाजूंनी जमाव आक्रमक होता. Kolhapur Violence |




