पारनेर (प्रतिनिधी) – दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला तसेच ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी राळेगणसिद्धी परिवाराने राळेगणसिद्धी ते पारनेर तहसील कार्यालय, अशा ट्रॅक्टर तिरंगा रॅलीचे आयोजन केले होते. प्रजासत्ताकदिनी ही रॅली संत यादवबाबा मंदिर परिसरातून सकाळी 10. 30 वाजता काढण्यात आली. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी हिरवा झेंडा दाखवून रॅलीस प्रारंभ केला. पारनेर येथे तहसील कार्यालयात तहसीलदार ज्योती देवरे यांना निवेदन देण्यात आले.
या वेळी भारत माता की जय, वंदे मातरम, अण्णा हजारे झिंदाबाद, अण्णा हजारे तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है, शेतकरी एकजुटीचा विजय असो, या घोषणांनी राळेगणसिद्धी परिसर दुमदुमून गेला होतो. राळेगणसिद्धी, पिंपळनेर व पानोली येथील शेतकरी ट्रॅक्टरसह रॅलीत सहभागी झाले होते. दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा असून, दिल्लीतील शेतकरी एकटे नाहीत. त्यांच्यासोबत देशातील सर्व शेतकरी आहेत, असे यावेळी हजारे यांनी सांगितले.
शिवसेना उपजिल्हाध्यक्ष रामदास भोसले, पंचायत समितीचे सभापती गणेश शेळके, राळेगणसिद्धीचे माजी सरपंच जयसिंग मापारी, माजी उपसरपंच लाभेश औटी, उद्योजक सुरेश पठारे, शंकर नगरे, भाकपचे तालुका सचिव संतोष खोडदे, पानोलीचे अंकुश गायकवाड, दादा पठारे, दत्ता आवारी, श्याम पठाडे, किसन मापारी, सुभाष पठारे, नानाभाऊ मापारी, रमेश औटी, संदीप पठारे, रोहिदास पठारे, सदाशिव पठारे, गणेश भापकर, सुभाष गाजरे आदींसह मोठ्या संख्येने शेतकरी या रॅलीत सहभागी झाले होते.
कृषी कायदे रद्द व्हावेत, शेतीमालाला हमीभाव देणारा सुरक्षा कायदा व्हावा, यासाठी दिल्लीत दोन महिन्यांपासून दिल्लीत आंदोलन सुरू आहे. तसेच हजारे यांनी स्वामिनाथन आयोगानुसार शेतीमाला हमीभाव मिळावा, केंद्रिय कृषिमूल्य आयोगाला स्वायत्तता मिळावी, यासाठी 30 जानेवारीपासून राळेगणसिद्धीत उपोषणाचा इशारा दिला आहे. या दोन्ही आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी या रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.