Rakul Preet Singh: अभिनेत्री रकुल प्रीत सिंह हिने बॉलिवूड इंडस्ट्रीत सुरू असलेल्या पेड पीआर (पैसे देऊन केलेला प्रचार) संस्कृतीबाबत स्पष्टपणे मत मांडले आहे. काही कलाकार आपल्या कामामुळे नाही, तर पडद्यामागे होणाऱ्या प्रचारामुळे चर्चेत राहतात, यावर तिने थेट भाष्य केलं. एका मुलाखतीत बोलताना रकुल (Rakul Preet Singh) म्हणाली की, इंडस्ट्रीत प्रत्येकालाच थोडं-फार पीआर करावं लागतं, कारण आपली उपस्थिती दाखवणं गरजेचं असतं. पण काही लोक तर इतरांची वाईट बाजू दाखवण्यापर्यंत जातात, हे त्यांना समजत नाही. “लोक इतके नकारात्मक कसे काय असू शकतात? अशा वागण्याने ते स्वतः कसे समाधानी राहू शकतात, हा माझा मोठा प्रश्न आहे,” असं ती म्हणाली. रकुलने पुढे सांगितलं की, तिला चांगल्या कर्मांवर विश्वास आहे. “चांगलं केलं तर त्याचं फळही चांगलंच मिळतं. माझा स्वभावच असा आहे की मी सतत पीआरचा विचार करत बसत नाही,” असंही तिने स्पष्ट केलं. Rakul Preet Singh पॅपराझीबद्दलही व्यक्त केलं मत पॅपराझी फोटो काढतात याबद्दल आपल्याला काहीच ताण नसल्याचं रकुलने सांगितलं. ती म्हणाली, “कधी-कधी माझी आई मला फोन करून विचारते, ‘तू पुन्हा तीच जीन्स घातली आहेस का? या महिन्यात पाचव्यांदा त्याच कपड्यांत तुझे फोटो आलेत!’” रकुलच्या मते, कधी आपण नीट सजलेले असतो, कधी नसतो ते स्वाभाविक आहे. त्यामुळे स्वतःवर इतका दबाव घेऊ नये. कामाच्या आघाडीवर वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर, रकुल प्रीत सिंह शेवटची ‘दे दे प्यार दे 2’ या चित्रपटात दिसली होती. तिच्या आगामी चित्रपटांमध्ये ‘पति पत्नी और वो 2’, कमल हासन यांचा ‘इंडियन 3’ आणि नितेश तिवारी दिग्दर्शित बहुचर्चित ‘रामायण’ यांचा समावेश आहे. ‘रामायण’ चित्रपटात रकुल सूर्पनखा या भूमिकेत दिसणार असून, या चित्रपटाचा पहिला भाग दिवाळी 2026 ला प्रदर्शित होणार आहे.