Rakshabandhan: अजित पवार सुप्रिया सुळेंकडून राखी बांधून घेणार का? स्वतः अजितदादा म्हणाले….

Ajit Pawar | Supriya Sule | Rakshabandhan: राष्ट्रवादी काँग्रेसच्या बंडानंतर राज्यातील राजकीय गणित पूर्णपणे बिघडले आहे. या बंडानंतर शरद पवार आणि अजित पवार असे दोन गट पडले. बंडानंतर दिवाळीत सगळे पवार कुटुंब एकत्र दिसून आले होते. त्यांनी सोबतच भाऊबीज साजरी केली होती.
त्यानंतर आता अजित पवार हे खासदार सुप्रिया सुळे यांच्यासोबत रक्षाबंधन साजरी करणार का? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. शरद पवार यांचं संपूर्ण कुटुंब एकत्रितपणे सर्व सण साजरी करताना यापूर्वी सर्वांनी पाहिलं आहे. मात्र, आता रक्षबांधनाचा सण देखील एकत्रितपणे साजरा होणार का? याबाबत अनेकांना उत्सुकता आहे.
दरम्यान, स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावर भाष्य केलं आहे. पत्रकारांनी त्यांना प्रश्न विचारला असता अजित पवार म्हणाले, “मी उद्या मुंबईला आहे. सुप्रिया उद्या मुंबईला असेल तर मी तिच्याकडे जावून राखी बांधेन. मी मुंबईला आहे. माझे मुंबईत कार्यक्रम आहेत.
माझी सकाळपासून बैठक आहे. त्यामुळे मुंबईत माझ्या जेवढ्या बहिणी उपलब्ध असतील त्यांच्याकडे जाऊन मी राखी बांधून घेईन”, अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली.
अजित पवार यांच्या या वक्तव्यानुसार, सुप्रिया सुळे उद्या मुंबईत असल्या तर दोन्ही बहीण-भाऊ रक्षाबंधन सण साजरी करणार आहेत. पण सुप्रिया सुळे या उद्या नाशिक दौऱ्यावर असल्याची माहिती मिळत आहे.





