Raksha Bandhan 2026 : रक्षाबंधनासाठी राखी पाठवणे महागले; पोस्टाचे नवे दर लागू
Raksha Bandhan 2026 : रक्षाबंधनापूर्वी भारतीय डाक विभागाने पार्सल आणि स्पीड पोस्टचे दर वाढवले आहेत. 500 ग्रॅम पार्सलसाठी आता 77 ते 84 रुपये शुल्क लागणार आहे.

Raksha Bandhan 2026 : रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर पोस्टाच्या माध्यमातून भाऊ-बहिणींना राखी, मिठाई किंवा भेटवस्तू पाठवणाऱ्यांच्या खिशाला आता अधिक कात्री लागणार आहे. भारतीय डाक विभागाने पार्सल आणि स्पीड पोस्टच्या दरांमध्ये वाढ केली असून, 1 ऑगस्ट 2026 पासून नवे दर लागू झाले आहेत.
500 ग्रॅम पार्सलसाठी आता 77 ते 84 रुपये –
नव्या दरांनुसार 500 ग्रॅमपर्यंतच्या पार्सलसाठी पूर्वी 42 रुपये शुल्क आकारले जात होते. आता हे शुल्क गंतव्यस्थानानुसार 77 ते 84 रुपये झाले आहे. राज्यांतर्गत पार्सलसाठी 77 रुपये, महानगरांसाठी 82 रुपये, तर अन्य राज्यांमध्ये पाठवण्यासाठी 84 रुपये शुल्क आकारले जाणार आहे. यावर जीएसटीही लागू होईल.
उदाहरणार्थ, तीन भावांना प्रत्येकी सुमारे 500 ग्रॅम वजनाचे पार्सल पाठवायचे असल्यास पूर्वी सुमारे 146 रुपये खर्च येत होता. आता याचसाठी सुमारे 231 रुपये मोजावे लागतील.
स्पीड पोस्टही महाग –
स्पीड पोस्टच्या दरातही वाढ करण्यात आली आहे. 20 ग्रॅमपर्यंतच्या पार्सलसाठी पूर्वी 42 रुपये शुल्क होते. आता त्यासाठी 56 रुपये द्यावे लागतील. वजन आणि अंतर वाढल्यास शुल्कही वाढणार आहे.
वजनासोबत अंतराचाही विचार –
डाक विभागाच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, अनेक वर्षांनंतर पार्सल सेवांच्या दरांमध्ये सुधारणा करण्यात आली आहे. नव्या व्यवस्थेत शुल्क ठरवताना केवळ वजनच नव्हे, तर अंतर आणि गंतव्य क्षेत्राचाही विचार केला जाणार आहे. त्यामुळे समान वजनाच्या पार्सलसाठी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे शुल्क लागू होऊ शकते.
रक्षाबंधनाच्या काळात राखीसोबत मिठाई, कपडे आणि भेटवस्तू पाठवण्याचे प्रमाण वाढते. त्यामुळे बुकिंगपूर्वी पार्सलचे वजन, गंतव्यस्थान आणि त्यानुसार लागू होणारे शुल्क तपासणे ग्राहकांसाठी महत्त्वाचे ठरणार आहे.





