Raksha Bandhan: साता समुद्रापार पोहोचणार बहिणीचे प्रेम! परदेशात राखी पाठवण्यासाठी टपाल विभागाची भन्नाट सुविधा
Raksha Bandhan: राखीसोबत मिठाई सुरक्षित राहण्यासाठी बबल पॅकिंग अन् आकर्षक शुभेच्छापत्रे; खासगी कुरिअरपेक्षा किफायतशीर पर्याय.

Raksha Bandhan – भाऊ-बहिणीच्या प्रेमाचा धागा असलेला रक्षाबंधनाचा सण अवघ्या काही दिवसांवर आला असून, परदेशात राहणाऱ्या भावंडांपर्यंतही राखी वेळेत पोहोचविण्यासाठी पिंपरी-चिंचवड टपाल विभागाने विशेष सुविधा उपलब्ध करून दिली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा परदेशात राखी पाठविण्याला चांगला प्रतिसाद मिळत असून, अमेरिका, कॅनडा, फ्रान्स व इंग्लंड यांसह विविध देशांमध्ये राख्या पाठविण्यात येत आहेत.
उद्योगनगरी आणि आयटीनगरी अशी ओळख असलेल्या पिंपरी-चिंचवड शहरात देशभरातील नागरिक वास्तव्यास आहेत. तसेच आयटी हब असल्यामुळे परदेशात गेलेल्या स्थानिकांची संख्याही खूप मोठी आहे. यामुळे रक्षाबंधन आणि दिवाळीला पिंपरी-चिंचवडच्या टपाल कार्यालयातून जाणाऱ्या राख्या आणि मिठाई तसेच शहरात येणाऱ्या राख्या व मिठाईचे प्रमाण अधिक आहे.
खासगी कुरियरच्या तुलनेत टपाल विभागाला यंदा चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येत आहे. गेल्या काही वर्षांमध्ये टपाल विभागाने सणासुदीला परदेशात जाणाऱ्या पार्सलवर विशेष लक्ष केंदि्रत आले असून सुविधा अधिक चांगल्या केल्या आहेत. राखी पाठविण्यासाठी लाल रंगाचे आकर्षक विशेष पाकीट आणि शुभेच्छापत्र उपलब्ध करून देण्यात आले आहे. या कार्डची किंमत प्रत्येकी १२ रुपये आहे.
त्यामुळे नागरिकांना राखी, मिठाई आणि शुभेच्छापत्र एकाच वेळी सुरक्षितपणे पाठविण्याची सुविधा टपाल विभागामार्फत मिळत आहे. विशेष म्हणजे, खासगी कुरिअरच्या तुलनेत टपाल विभागाचे दर तुलनेने कमी असल्याने नागरिकांसाठी हा पर्याय अधिक किफायतशीर ठरत आहे. विशेष म्हणजे, खासगी कुरिअर सेवांच्या तुलनेत टपाल विभागाच्या माध्यमातून परदेशात राखी पाठविण्याचा खर्च तुलनेने कमी असल्याने नागरिकांकडून या सुविधेला पसंती मिळत आहे.
विशेष पॅकिंग सुविधा
रक्षाबंधनानिमित्त परदेशात राहणाऱ्या भावंडांना राखी आणि मिठाई पाठविणाऱ्या नागरिकांसाठी टपाल विभागाने विशेष पॅकिंग सुविधा उपलब्ध करून दिली आहे. मिठाई खराब होऊ नये किंवा वाहतुकीदरम्यान तिचे नुकसान होऊ नये, यासाठी बबल पॅकिंग असलेले विशेष बॉक्स उपलब्ध करून देण्यात आले आहेत. मिठाईच्या वजनानुसार आणि पाठविण्यात येणाऱ्या वस्तूच्या प्रकारानुसार बॉक्सचे शुल्क निश्चित करण्यात येते.
“गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा परदेशात राखी पाठविण्याचे प्रमाण वाढले आहे. अमेरिका, कॅनडा, फ्रान्स आदी देशांमध्ये राखी पाठविण्यासाठी नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. राखीसोबत मिठाई सुरक्षितपणे पाठविण्यासाठी बबल पॅकिंगची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे.”
– के.एल. पारखी, जनसंपर्क अधिकारी टपाल विभाग






