Pimpri : भाऊरायासाठी राखी सुरक्षित!

हिंजवडी : रक्षाबंधनाच्या सणाला अवघे काही दिवस बाकी असताना, पिंपरी चिंचवडमधील महिलांनी आपल्या दूरदेशी असलेल्या भावांसाठी राखी पाठवण्याची जोरदार तयारी सुरू केली आहे. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर टपाल विभागाने यंदा खास वॉटरप्रूफ राखी पाकिटे विक्रीसाठी उपलब्ध करून दिली आहेत. यामुळे पावसामुळे राखी खराब होण्याची शक्यता पूर्णतः टळणार आहे.
रक्षाबंधन हा सण यंदा ९ ऑगस्ट रोजी साजरा होणार आहे. त्यामुळे शहरातील टपाल कार्यालयांमध्ये राखी पाठवण्यासाठी महिलांची विशेष गर्दी पाहायला मिळत आहे. टपाल विभागाने राखी पार्सलसाठी स्वतंत्र बॅग, छाटणी व्यवस्था आणि दिवसभरातील राखी पार्सल तत्काळ रवाना करण्यासाठी विशेष मेल वाहनाचीही व्यवस्था केली आहे.
वॉटरप्रूफ पाकिटांना प्रतिसाद
टपाल कार्यालयात उपलब्ध असलेल्या विविध रंगांतील वॉटरप्रूफ पाकिटे महिलांसाठी आकर्षण ठरत असून केवळ १२ रुपयांत हे पाकीट मिळत असल्याने त्यांची दैनंदिन मोठ्या प्रमाणावर विक्री होत आहे. पाकिटांच्या माध्यमातून टपाल विभागाला महसूलही मिळत आहे.
समर्पित सेवा, जलद पोहोच
पिंपरी चिंचवडमधून दररोज शेकडो राखी पार्सल बुक केली जात आहेत. शहरातील विविध टपाल कार्यालयांमधून एकूण हजारांहून अधिक राखी पार्सलांची नोंद होत आहे. विशेष म्हणजे, राखी पार्सलची मिक्सिंग टाळण्यासाठी त्यांची छाटणी वेगळी केली जात असून, ज्या दिवशी पार्सल जमा होते, त्याच दिवशी त्याची पाठवणी केली जात आहे.
परदेशातही राखी पोहोचते वेळेत
अमेरिका, कॅनडा, ऑस्ट्रेलिया आणि जर्मनी यांसारख्या देशांमध्ये राहणाऱ्या भावांसाठी राखी पाठवण्यासाठी पिंपरी चिंचवड शहरातून मोठ्या प्रमाणात पार्सल नोंदवली जात आहेत. अनेक राखी पार्सल विमानाच्या माध्यमातून पाठवले जात असल्याने ती वेळेत पोहोचत आहेत. भावासोबतचे नाते जपणाऱ्या प्रत्येक बहिणीसाठी राखी सुरक्षित आणि वेळेत पोहोचावी यासाठी ही विशेष व्यवस्था करण्यात आली आहे,” अशी माहिती टपाल कार्यालयाकडून दिली जात आहे.





