Rakesh Roshan : राकेश रोशन यांची अचानक तब्येत बिघडली; संपूर्ण रोशन कुटुंब रुग्णालयात दाखल, मुलीने दिली माहिती

Rakesh Roshan : जेष्ठ अभिनेते आणि दिग्दर्शक राकेश रोशन यांची तब्येत बिघडली असल्याची बातमी समोर आली आहे. त्यांची तब्येत अचानक बिघडल्याने त्यांना मुंबईच्या कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
अचानक राकेश रोशन यांना रुग्णालयात नेण्यात का आले असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. राकेश यांची तब्येत इतकी बिघडली की त्यांना जनरल वॅार्डमधून आयुसीमध्ये शिफ्ट करावे लागले आहे. याबाबत त्यांची मुलगी सुनैना हिने पुष्टी केली आहे.
वृत्तानुसार, राकेश यांची तब्येत आता चांगली असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यांच्यावर रुग्णालयात काय उपचार झाले याची माहितीही शेअर करण्यात आली आहे. त्यांची मुलगी सुनैना यांनी दिलेल्या माहितीनुसार, तिच्या वडिलांच्या मानेवर अँजिओप्लास्टी करण्यात आली आहे. वेळेवर उपचार मिळाल्याने आता ते पूर्णपणे बरे आहेत. काळजी करण्यासारखे काहीही नाही, असे तिने सांगितले आहे.
सध्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार ते विश्रांती घेत आहेत, असेही तिने म्हटले आहे. संपूर्ण रोशन कुटुंब राकेश रोशनसोबत रुग्णालयात उपस्थित आहे आणि त्यांची काळजी घेत आहे, अशी माहिती मिळत आहे.
राकेश रोशन यांच्याविषयी….
राकेश रोशन यांनी वयाची पंचाहत्तरी गाठली आहे. त्यांनी 1970 आणि 1980 च्या दशकात अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यांनी केलेले अनेक चित्रपट प्रचंड गाजले. यामध्ये ‘घर घर की कहानी’, ‘खेल खेल में’, ‘खट्टा मीठा’ आदी चित्रपटांचा समावेश होतो. याशिवाय त्यांनी काही चित्रपटांचे दिग्दर्शनही केले आहे. यामध्ये ‘खून भरी मांग’, ‘करण अर्जुन’ कहो ना प्यार है या चित्रपटांचा समावेश होतो.





