Aaditya Thackeray : शरद पवारांच्या नावावर शिकामोर्तब? आदित्य ठाकरेंच्या पोस्टने वेधले सर्वांचे लक्ष
Aaditya Thackeray : शरद पवारांच्या नावाच्या चर्चेवर आदित्य ठाकरेंनी 'अद्याप निर्णय नाही' असे म्हणत सस्पेन्स वाढवला आहे.

Aaditya Thackeray : राज्यसभेच्या निवडणुकीला अवघे काही दिवस शिल्लक असताना महाविकास आघाडीमध्ये एका जागेवरून चर्चा रंगताना दिसत आहे. या जागेसाठी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या नावाची चर्चा सुरू असल्याच्या बातम्या समोर आल्या आहेत. मात्र या पार्श्वभूमीवर शिवसेना (ठाकरे गट) नेते आदित्य ठाकरे यांनी स्पष्टीकरण देत अद्याप कोणताही अंतिम निर्णय झालेला नसल्याचे स्पष्ट केले आहे.
१६ मार्च रोजी राज्यातील राज्यसभेच्या सहा जागांसाठी निवडणूक होणार आहे. त्यापैकी पाच जागा महायुतीच्या खात्यात जाणे जवळपास निश्चित मानले जात आहे, तर महाविकास आघाडीच्या वाट्याला एक जागा येणार आहे. याच एका जागेसाठी मविआतील घटक पक्षांमध्ये चुरस वाढल्याचे चित्र आहे.
या जागेसाठी शरद पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. दुसरीकडे, ही जागा शिवसेनेलाच मिळावी यासाठी आदित्य ठाकरे आग्रही असल्याची चर्चा आहे. दरम्यान, काँग्रेसकडून शिवसेनेला राज्यसभेची जागा सोडावी आणि बदल्यात विधानपरिषदेची जागा उद्धव ठाकरे यांच्यासाठी घ्यावी, अशी ऑफर दिल्याचीही माहिती समोर आली आहे.
या सर्व घडामोडींनंतर आदित्य ठाकरे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत स्पष्ट केले की, राज्यसभेच्या जागेबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. मविआतील सर्व नेते एकत्र बसून लवकरच यावर निर्णय घेतील, असे त्यांनी नमूद केले आहे.
दरम्यान, राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे आणि जयंत पाटील यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. मात्र त्या बैठकीतही राज्यसभेच्या उमेदवारीबाबत अंतिम निर्णय झालेला नसल्याची माहिती आहे. त्यामुळे मविआच्या एका जागेवरून राजकीय चर्चांना अधिकच वेग आला आहे.




