मुंबई : राजधानी मुंबईत आपलं स्वत:चं घर असाव हे प्रत्येकाचं स्वप्न असतं. स्वप्ननगरी असलेल्या मुंबईतील या घरासासाठी राज्यातील आमदार-खासदार व इतर लोकप्रतिनिधी देखील इच्छुक असतात. त्यामुळेच, म्हाडाच्या लॉटरीमध्ये लोकप्रतिनिधींसाठीदेखील घराची आरक्षित सोडत असते. यामुळे त्यांचेदेखील स्वप्न पूर्ण होण्यास मदत होते. मागच्या महिन्यात म्हाडाकडून 2030 घरांसाठी लॉटरीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. या लॉटरीची सोडत आज निघाली असून 2030 जणांचं मुंबईतील स्वप्नाचं घर आता सत्यात उतरलं आहे. त्यामध्ये, अनेक मराठी कलाकारांना घर लागलं असून माजी खासदार व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी यांनाही म्हाडाच्या लॉटरीत घर मिळालं आहे. राजू शेट्टी यांनी एमपी म्हणजेच खासदार कोट्यातून मध्यम श्रेणीतील घरासाठी अर्ज केला होता. त्यानुसार, त्यांना पवईतील मध्यम श्रेणीतील घर लागलं असून या घराची किंमत जवळपास 1 कोटी 20 लाख रुपये एवढी आहे. या सोडतीसाठी 1 लाख 13 हजार जणांनी अर्ज केला होता. मात्र, या अर्जदारांपैकी फक्त 2030 भाग्यवंतांना हे घर मिळाले आहे. उर्वरित अर्जदारांची निराशा झाली. मात्र गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनी लवकरच आणखी एक लॉटरी आणणार आहोत, असे जाहीर केले.