पुणे : मार्केट यार्डात हापूसची पहिली आवक झाली आहे. दरवर्षी राज्यातून रत्नागिरी भागातून पहिली आवक होते. मात्र, यंदा कर्नाटकने बाजी मारली आहे. कर्नाटक येथील टुंकूर भागातून ही पहिली आवक झाली आहे. रोहन सतिश उरसळ यांच्या गाळ्यावर कर्नाटक येथील शेतकरी जी.एम.शफीउल्ला यांच्या शेतातून सहा पेट्यांची आवक झाली. ४ डझानाच्या पेटीला लिलावात ५ हजार १०० रुपये भाव मिळाला. सुरेश केवलाणी आणि बोनी रोहरा यांनी या पेटीची खरेदी केली. त्यावेळी सतिश उरसळ, आडते असोसिएशनचे माजी उपाध्यक्ष युवराज काची यांच्यासह अन्य आडतदार उपस्थित होते. दोन दिवसांपूर्वी रविवारी (दि.१४) कर्नाटक येथून लालबाग आंब्याची आवक झाली होती. त्यानंतर आता हापूसचीही आवक सुरू झाली आहे. नेहमीच्या तुलनेत २० ते २५ दिवस आधीच ही आवक झाली आहे. मागील वर्षीच्या तुलनेत ३० टक्के अधिक भाव मिळाला आहे. हवामान बदलामुळे मागील वर्षी कर्नाटक येथील पिकांचे नुकसान झाले होते. त्यामुळे आवक कमी झाली होती. मात्र, यंदा अधिक आवक होण्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. फेब्रुवारीमध्ये तुरळक आवक होईल. दरवर्षी एप्रिलमध्ये हंगाम सुरू होतो. मात्र, तो यंदा मार्चमध्येच सुरू होण्याचा अंदाज आहे. मालाचा दर्जा चांगला असल्याचेही यावेळी सांगण्यात आले. पोषक हवामानामुळे उत्पादन झाल्यामुळे यंदा लवकरच कर्नाटक हापूसची आवक झाली आहे. यंदा नेहमीच्या तुलनेत जास्त आवक होण्याचा अंदाज आहे. रोहन उरसळ, कर्नाटक आंब्याचे व्यापारी