Raju Patil : पक्ष फोडल्याशिवाय गद्दारांची टोळी फुगणार नाही; राजू पाटील यांची शिंदेवर टीका

डोंबिवली : डोंबिवलीतील एकतानगर प्रभागाचे मनसेचे माजी नगरसेवक राजन मराठे, त्यांच्या पत्नी ज्योती मराठे आणि मनसे कार्यकर्त्यांनी सोमवारी शिंदेसेनेत प्रवेश केला. राजन मराठे व मनसेचे माजी आमदार राजू पाटील यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते. मात्र, राजन मराठे यांनी शिंदेसेनेत प्रवेश केल्यानंतर राजू पाटील यांनी शिंदेसेनेवर व जवळच्या मित्रावर सडकून टीका केली.
आपल्या अधिकृत सोशल मिडीया अकाउंटवरुन राजू पाटील यांनी संताप व्यक्त केला केला. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये, एखाद्या माणसाला पोर होत नाही. तेव्हा तो माणूस पोर दत्तक घेतो. आता गद्दारांच्या टोळीत सगळेच इकडून तिकडून उचलून आणलेले दलबदलू आहेत. इतर पक्षांमधून फोडून आणल्याशिवाय या गद्दारांची टोळी फुगणार नाही. त्यासाठी पक्ष फोडीतून दलबदलूंना उचलण्याची मोहीम गद्दारांनी सुरू केली आहे, अशी टीका राजू पाटील यांनी केली आहे.
ज्यांचे दूध टाकून दिवस चालले होते. पण ते सदवर्तनी, प्रामाणिक वाटल्याने त्यांना जीवाभावाचा माणूस म्हणून सर्व प्रकारचा आधार दिला. मोठा केला. धंदा पाणी दिला. कुटुंबातील एक सदस्य म्हणून त्यांना आम्ही वागणूक दिली. असे हे खाऊन पिऊन धनदांडगे धष्टपुष्ट होऊन आता आमच्या खांद्यावर लघुशंका करून, पाय देऊन खुशाल माणूसकी, आपुलकीच्या भावाला चिखलात, खड्यात तुडवून गद्दारांच्या गटात सामील होतात. तेव्हा आता विश्वास ठेवायचा कोणावर? असा प्रश्न राजू पाटील यांनी केला आहे.
शिंदेसेनेत इनकमिंग सुरुच
ठाणे महापालिका प्रशासनाने नवीन प्रारुप प्रभाग रचना आराखडा जाहीर केल्यानंतर लगेचच राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाचे नेते बाबाजी पाटील यांनी कार्यकर्त्यांसह शिंदेसेनेत प्रवेश केला. बाबाजी पाटील यांच्या प्रभागाला दिवा परिसर जोडण्यात आल्याने हा प्रभाग शिंदेसेनेसाठी पोषक झाल्याची चर्चा सुरू झाली होती. असे असतानाच, बाबाजी पाटील यांच्या शिवसेना पक्ष प्रवेशामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. या पक्ष प्रवेशांच्या निमित्ताने शिंदेच्या शिवसेनेने जितेंद्र आव्हाड यांना धक्का देत या भागात आपली ताकद वाढविल्याचे चित्र आहे.





