Raju Patil : मनसे नेते राजू पाटील फडणवीसांच्या भेटीला; चर्चांना उधाण…

Raju Patil – महायुतीचा मंत्रिमंडळ विस्तार रविवारी होणार असून भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेतील आमदारांकडून मंत्रिपदासाठी लॉबिंग सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेतील नेत्यांनी शनिवारी ( 14 डिसेंबर ) सकाळपासून सागर बंगल्यावर धडकण्यास सुरूवात केली आहे. यातच मनसेचे माजी आमदार राजू पाटील यांनीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सागर बंगल्यावर भेट घेतली आहे.
राजू पाटील हे सागर बंगल्यावर आल्याने विविध राजकीय चर्चांना उधाण आले पण, राजू पाटील आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट राजकीय नाहीतर व्यक्तिगत असल्याची माहिती समोर आली आहे.
राजू पाटील यांची गाडी सकाळी सागर बंगल्यावर आल्याने राजकीय चर्चा रंगल्या होत्या. मात्र, मुलाच्या लग्नाची पत्रिका देण्यासाठी राजू पाटील सागर बंगल्यावर देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. राजू पाटील यांनी फडणवीस यांना मुलाच्या लग्नाचे आमंत्रण दिले आहे.
राजू पाटील यांचे सुपुत्र आदित्य पाटील आणि भिवंडीचे भाजपचे माजी आमदार योगेश पाटील यांची कन्या सिद्धी पाटील यांचा जानेवारी महिन्यात साखरपुडा झाला होता. त्यामुळे भाजप आणि मनसेचे माजी आमदार एकमेकांचे व्याही झाले आहेत.





