Rajnath Singh : शांघाय सहकार्य संघटनेच्या बैठकीला राजनाथ सिंह लावणार हजेरी

नवी दिल्ली : चीनमधील किंगदाओ उद्यापासून ते २६ जून पर्यंत यंदाची शांघाय सहकार्य संघटनेच्या (एससीओ ) संरक्षण मंत्र्यांची बैठक होणार आहे. या बैठकीत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह भारताच्या उच्चस्तरीय शिष्टमंडळाचे नेतृत्व करतील.
या बैठकीत, संरक्षण मंत्री प्रादेशिक तसेच आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षा, दहशतवादविरोधी प्रयत्न आणि शांघाय सहकार्य संघटनेच्या सदस्य राष्ट्रांच्या संरक्षण मंत्रालयांमधील परस्पर सहकार्य यासह अनेक मुद्द्यांवर चर्चा करतील अशी अपेक्षा आहे.
या बैठकीत संरक्षण मंत्री शांघाय सहकार्य संघटनेची तत्वे आणि नियमांप्रती भारताची बांधिलकी, आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षा प्रस्थापित करण्यासंबंधीचा भारताचा दृष्टीकोन, या प्रदेशातील दहशतवाद आणि कट्टरवादाचे उच्चाटन करण्यासाठी एकत्रित आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांचे आवाहन, तसेच शांघाय सहकार्य संघटनेअंतर्गत अधिकाधिक व्यापार, आर्थिक सहकार्य आणि दळणवळणी जोडणीची गरज अधोरेखित करतील अशी अपेक्षा आहे. ते या बैठकीच्या पार्श्वभूमीवर चीन आणि रशियासह काही सहभागी देशांच्या संरक्षण मंत्र्यांसोबत द्विपक्षीय बैठकाही घेणार आहेत.





