Rajnath Singh: ऑपरेशन सिंदूरवरून संसदेची दिशाभूल करणाऱ्या राजनाथ सिंहांनी राजीनामा द्यावा; काँग्रेसची मागणी
Rajnath Singh: कर्नाटक काँग्रेसचे अध्यक्ष बी. के. हरिप्रसाद यांनी आज संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या राजीनाम्याची मागणी केली.

Rajnath Singh: कर्नाटक काँग्रेसचे अध्यक्ष बी. के. हरिप्रसाद यांनी आज संरक्षण मंत्री राजनाथ सिंह (Rajnath Singh ) यांच्या राजीनाम्याची मागणी केली. ऑपरेशन सिंदूरमध्ये शहीद झालेल्या सहा जवानांची नावे अलीकडेच राष्ट्रीय युद्ध स्मारकावर कोरण्यात आल्याने निर्माण झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी ही मागणी केली.
सोशल मीडियावरील एका पोस्टमध्ये, बी. के. हरिप्रसाद यांनी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी २०२५ मध्ये संसदेत केलेल्या एका विधानाचा संदर्भ दिला. त्यांनी दावा केला की, “संरक्षण मंत्र्यांनी स्पष्टपणे सांगितले होते की, ऑपरेशन सिंदूरमध्ये एकही भारतीय जवान शहीद झाला नाही.”
पुढे ते म्हणाले की, या ऑपरेशनमध्ये शहीद झालेल्या जवानांची नावे नंतर सार्वजनिक केल्याने, संरक्षण मंत्र्यांचे पूर्वीचे विधान आणि त्यानंतर समोर आलेली माहिती यांच्यात गंभीर विरोधाभास दिसून येतो.
हरिप्रसाद यांनी पुढे आपल्या पोस्टमध्ये, “संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी संसदेत स्पष्टपणे सांगितले होते की ऑपरेशनसिंदूर दरम्यान एकही भारतीय सैनिक शहीद झाला नाही. मात्र , भाजप सरकारने नंतर सर्वोच्च बलिदान देणाऱ्या सैनिकांची नावे सार्वजनिक केल्याने त्यांच्या पूर्वीच्या विधानातील गंभीर विरोधाभास उघड झाला आहे.” असे म्हटले आहे. (Rajnath Singh)
हरिप्रसाद पुढे म्हणाले, “जर राष्ट्रीय महत्त्वाच्या अशा गंभीर विषयावर संसदेची दिशाभूल केली गेली असेल, तर जबाबदारी टाळता येणार नाही. संसदेची दिशाभूल केल्याबद्दल संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी राजीनामा द्यावा. आपल्या शहीदांना सत्य, प्रामाणिकपणा आणि आदर मिळायला हवा, परस्परविरोधी विधाने नव्हेत.”
मे २०२५ मध्ये पाकिस्तानविरुद्ध चार दिवसांच्या ऑपरेशन सिंदूरमध्ये शहीद झालेल्या सहा भारतीय सुरक्षा दलाच्या जवानांची नावे आता नवी दिल्लीतील राष्ट्रीय युद्ध स्मारकावर कोरण्यात आली आहेत. हा मुद्दा तापू लागल्यावर, संरक्षण मंत्रालयाने शनिवारी स्पष्ट केले की, ऑपरेशन सिंदूर दरम्यान सर्वोच्च बलिदान देणाऱ्या सहा सैनिकांना देशाने योग्य वेळी आधीच सन्मानित केले होते. त्यांच्या बलिदानाला अलीकडेच “पहिल्यांदाच” सार्वजनिकरित्या मान्यता देण्यात आल्याचा दावा मंत्रालयाने फेटाळून लावला.
Defence Minister @rajnathsingh categorically had told Parliament that no Indian soldiers had lost their lives during #OperationSindoor.
The @BJP4India Govt’s own subsequent disclosure naming the personnel who made the supreme sacrifice exposes a serious contradiction.
If…
— Hariprasad.B.K. (@HariprasadBK2) June 29, 2026
संरक्षण मंत्रालयाच्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, “माध्यमांच्या काही विभागांमध्ये आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर प्रसारित झालेल्या काही वृत्तांमध्ये असा चुकीचा दावा करण्यात आला आहे की, ‘ऑपरेशन सिंदूर’ दरम्यान सर्वोच्च बलिदान देणाऱ्या सहा शूर सैनिकांच्या बलिदानाची नुकतीच दखल घेण्यात आली आहे किंवा ते पहिल्यांदाच सार्वजनिक करण्यात आले आहे. हे स्पष्ट केले जाते की, संबंधित वृत्ते समोर येण्यापूर्वीच, उपलब्ध असलेल्या पहिल्या संधीतच देशाने या शहीदांना आदरांजली वाहिली होती.”
या प्रसिद्धीपत्रकानुसार, ११ मे २०२५ रोजी आयोजित एका अधिकृत पत्रकार परिषदेत, तत्कालीन लष्करी कारवायांचे महासंचालक (DGMO) यांनी या शूर सैनिकांना आदरांजली वाहिली होती आणि ‘ऑपरेशन सिंदूर’ दरम्यान कर्तव्य बजावताना त्यांनी केलेल्या सर्वोच्च बलिदानाचा विशेष उल्लेख केला होता.
याव्यतिरिक्त, या शूर सैनिकांना शौर्य पुरस्कार देऊनही सन्मानित करण्यात आले, ज्याची माहिती १४ ऑगस्ट २०२५ रोजीच्या एका अधिकृत प्रसिद्धीपत्रकात सार्वजनिक करण्यात आली. मंत्रालयाने म्हटले आहे की, भारतीय सशस्त्र दलांच्या सर्वोच्च परंपरेनुसार, त्यांच्या शौर्याची आणि सर्वोच्च बलिदानाची ही एक औपचारिक, राष्ट्रीय स्तरावरील मान्यता होती.
ऑपरेशन सिंदूरमध्ये शहीद झालेल्या सहा जवानांची नावे प्रथमच जाहीर (Rajnath Singh)
भारत सरकारने ऑपरेशन सिंदूर दरम्यान शहीद झालेल्या सहा जवानांची नावे प्रथमच अधिकृतपणे जाहीर केली आहेत. या शूर जवानांची नावे दिल्लीतील राष्ट्रीय युद्ध स्मारकाच्या वेबसाइटवरील ‘रोल ऑफ ऑनर’मध्ये कोरली जातील. पाकिस्तानमधील दहशतवादी तळ उद्ध्वस्त करण्यासाठी भारताने ६ आणि ७ मे २०२५ च्या मध्यरात्री ऑपरेशन सिंदूर सुरू केले होते.





