Rajnath Singh: राजनाथ सिंह आणि मोहोळ यांच्यात महत्त्वाची बैठक; पुण्याचे तीन मोठे प्रश्न मार्गी लागण्याची चिन्हे
Rajnath Singh : विमानतळ विस्तारासाठी जमीन हस्तांतरण, कॅन्टोन्मेंट विलिनीकरण आणि इंदिरानगर प्रश्नावर सकारात्मक संकेत; मोहोळ यांनी व्यक्त केला विश्वास.

Rajnath Singh – विमानतळ विस्तार, पुणे, खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डांचे पुणे महापालिकेत विलीनीकरण आणि इंदिरानगर-बर्मा शेल वसाहतीतील नागरिकांना हवाई दलाने बजावलेल्या नोटीसा या प्रमुख मुद्द्यांवर गुरुवारी (दि. १०) केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेतली. सकारात्मक चर्चेनंतर या प्रश्नांबाबत पुढील कार्यवाहीचे निर्देश संरक्षण मंत्र्यांनी दिल्याने प्रलंबित विषयांना गती मिळेल असे केंद्रीय नागरी हवाई वाहतूक व सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले.
विमानतळाच्या विस्तारासाठी एकूण ३०० एकर जागा राज्य सरकार स्वतः संपादित करणार आहे. सद्यस्थितीत टर्मिनलला लागूनच हवाई दलाची ३५ एकर जागा आहे. राज्य सरकारने या जागेच्या बदल्यात हवाई दलाला त्याच परिसराला ६५ एकर जागा देण्याची तयारी दर्शवली आहे. संरक्षण मंत्रालयाने हवाई दलाला याबाबत निर्देश दिल्यास विस्तारीकरणाचे काम वेगाने होईल. पुणे आणि खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डांचे महापालिकेत विलीनीकरण करण्याबाबतही चर्चा झाली.
या दोन्ही बोर्डांच्या जमिनी पालिकेत समाविष्ट करण्याचा प्रस्ताव एप्रिल २०२६ मध्ये राज्य सरकारने संरक्षण मंत्रालयाकडे पाठवला होता. यावर केंद्राने लवकर निर्णय घ्यावा, अशी मागणी मोहोळ यांनी केली. लोहगाव येथील इंदिरानगर-बर्मा शेल वसाहतीतील नागरिकांना हवाई दलाने नोटिसा दिल्या आहेत. या प्रकरणात संरक्षण खाते आणि महापालिकेने समन्वयातून मार्ग काढण्यासंदर्भात सकारात्मक चर्चा झाली.
“पुण्याच्या विकासाशी आणि नागरिकांच्या हिताशी संबंधित संरक्षण खात्याचे विषय प्रलंबित होते. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्याशी चर्चा झाली असून, त्यांनी आवश्यक कार्यवाहीचे निर्देश दिले आहेत. विमानतळ विस्तार, कॅन्टोन्मेंट विलीनीकरण आणि इंदिरानगरच्या प्रश्नांवर लवकरच ठोस होईल.”
– मुरलीधर मोहोळ, केंद्रीय नागरी हवाई वाहतूक व सहकार राज्यमंत्री





