Rajnath Singh : नितिश कुमारच होणार बिहारचे मुख्यमंत्री; राजनाथ सिंह यांनी केले स्पष्ट

पाटणा : भारतीय जनता पार्टी आणि नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली बिहार विकासाच्या मार्गावर आहे. आमचे मुख्यमंत्री असोत किंवा उपमुख्यमंत्री, त्यांच्या प्रतिमेवर कोणताही डाग नाही, कोणीही त्यांच्यावर कोणता आरोप करू शकत नाही. यावेळची विधानसभा निवडणूक केवळ विकासाच्या मुद्द्यावर असेल आणि नितीश कुमारच बिहारचे पुढचे मुख्यमंत्री असतील आणि एनडीए बिहारमध्ये दोन तृतीयांश बहुमताने सरकार स्थापन करेल असा विश्वास केंद्रीय मंत्री आणि भाजपचे नेते राजनाथ सिंह यांनी व्यक्त केला.
राजनाथ सिंह यांनी लालू प्रसाद यादव यांच्यावर टीका करताना म्हटले की, बिहारच्या विनाशात राष्ट्रीय जनता दलासह काँग्रेसही दोषी आहे. त्यांच्या दोघांच्याही सरकारांनी बिहारला रसातळाला ढकलले होते. गुन्हेगारी, जातीयवाद आणि जंगलराजमुळे बिहार अंधारात गेला होता, हळूहळू हा अंधार संपला आहे. भाजप आणि नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली बिहार विकासाच्या मार्गावर आहे, एकेकाळी उद्ध्वस्त झालेला बिहार आज स्वावलंबी झाला आहे.
राजनाथ म्हणाले, बिहारला अंधारात ढकलणारे यशस्वी होऊ शकणार नाहीत. कर्पूरी ठाकूर यांची विचारसरणी फक्त आणि फक्त भाजप आणि एनडीएच आणू शकतात. लालूजी जननायक कर्पूरी ठाकूर यांच्यासाठी अपशब्द वापरत असत आणि त्यांचा हा दुटप्पीपणा चालणार नाही. लालूंनी कधीही कर्पूरीजींचा आदर केला नाही. केंद्र सरकारने कर्पूरीजींना मरणोत्तर भारतरत्न देऊन खरा आदर दिला, आम्ही जे बोलतो ते करतो.
लालू यादव यांनी बाबासाहेब आंबेडकरांचा फोटोचा अवमान केला, ही खूप लज्जास्पद बाब आहे. यावरून आरजेडीची विचारसरणी काय आहे हे दिसून येते, या लोकांचा खरा चेहरा समाजासमोर येत आहे. आरजेडी-काँग्रेसने मिळून बिहारला गुन्हेगारी-बेरोजगारी दिली आणि महिलांना असुरक्षित ठेवले. लालूजींच्या राजवटीत संविधानाऐवजी गोळ्यांचा आवाज ऐकू यायचा, लोकांना याची आठवण करून दिली पाहिजे. सामंतवादी मानसिकतेच्या लोकांनी समाजवादाची वेशभूषा परिधान करून बिहारशी विश्वासघात केला आहे, या सर्व गोष्टी बिहारच्या लोकांना समजावून सांगाव्या लागतील असेही राजनाथ म्हणाले.





