Rajnath Singh : दहशतवादाबद्दल भारत शून्य सहिष्णु; संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांचे विधान

नवी दिल्ली : दहशतवाद हा मानवतेच्या शापासारखा आहे. त्याबाबत आमची दृष्टी सुरुवातीपासूनच शून्य सहिष्णुतेची आहे. आज संपूर्ण जगासमोर दहशतवाद हे सर्वात मोठे आव्हान आहे. तो मानवता, शांती, सहजीवन, विकास आणि लोकशाही यासारख्या मूल्यांचा शत्रू आहे, असे प्रतिपादन संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी केले आहे. एका वृत्तपत्रासाठी केलेल्या लेखनात राजनाथ सिंह म्हणतात की, कोणत्याही परिस्थितीत भारत दहशतवादाला शरण जाणार नाही.
राजनाथ सिंह यांनी या लेखात पुढे असे लिहिले आहे की, दशतवाद एका कठोर विचारसरणीचा हा परिणाम आहे. त्यामुळे केवळ विनाश, भीती आणि द्वेषाचा जन्म होतो. इतिहास साक्ष आहे की दहशतवाद प्रत्येक दृष्टीकोनातून विध्वंसक आहे. हा एक भ्रम आहे की, दहशतवादी स्वातंत्र्य सैनिक असू शकतो. कोणतेही धार्मिक, वैचारिक किंवा राजकीय कारण दहशतवादाचे औचित्य सिद्ध करू शकत नाही. काही दिवसांपूर्वी राजनाथ सिंह यांनी आपला रोख पाकव्याप्त काश्मीरवर वळवला होता.
पीओके आता आपल्या भारताचा असेल, तो दिवस फार दूर नाही. तेथील लोक भारतात परत येतील. पीओके परत घेईपर्यंत आम्ही थांबणार नाही. या विधानामुळे पाकिस्तान पुन्हा एकदा जागे होईल. भारतातील मेक इन इंडिया हा भारतातील राष्ट्रीय सुरक्षेतील एक महत्त्वाचा घटक आहे. जर आमच्याकडे ही क्षमता नसेल तर आमची सैन्य पाकिस्तानला त्रास देऊ शकली नसती. दहशतवादाचा व्यवसाय चालविणे पाकिस्तानसाठी परवडणारे नाही. त्याची त्यांना भारी किंमत द्यावी लागेल. पाकिस्तानला आता याची चांगली जाणीव झाली आहे असे राजनाथ सिंह यांनी म्हटले आहे.





