Pune District : लोहगावात राजमाता जिजाऊ संकल्पनामा प्रसिद्ध

वाघोली : राजमाता जिजाऊ यांच्या जन्मोत्सवाचे औचित्य साधून लोहगाव येथे भारतीय जनता पार्टीच्या वतीने ‘राजमाता जिजाऊ संकल्पनामा’ प्रसिद्ध करण्यात आला. हा संकल्पनामा केवळ राजकीय घोषणा नसून लोहगाव, विमाननगर, सोमनाथ नगर व वाघोली परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी तसेच महिला सक्षमीकरणासाठी घेतलेली एक ठाम शपथ आहे, असे प्रतिपादन भाजप नेते रामभाऊ दाभाडे यांनी केले.
या संकल्पनाम्यातून राजमाता जिजाऊंच्या विचारांवर आधारित विकासाचा आराखडा मांडण्यात आला असून, त्यात विशेषतः महिलांच्या सक्षमीकरणावर भर देण्यात आला आहे. महिलांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण करणे, सुरक्षिततेसाठी ठोस उपाययोजना राबवणे, हा यामागील मुख्य उद्देश असल्याचे दाभाडे यांनी सांगितले. संकल्पनाम्यात प्रभागातील पायाभूत सुविधांचा विकास, रस्ते, पाणीपुरवठा व वीज या मूलभूत प्रश्नांवर ठोस उपाययोजना करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला आहे. तसेच तरुण पिढीसाठी दर्जेदार शैक्षणिक सुविधा आणि नागरिकांच्या आरोग्यासाठी सुसज्ज आरोग्य केंद्रे उभारण्यावर भर देण्यात आला आहे. लोहगावचा ऐतिहासिक व सांस्कृतिक वारसा जपण्याचाही मानस यामध्ये व्यक्त करण्यात आला आहे.
जिजाऊंच्या विचारांचा वारसा, विकासाचा नवा भरवसा या घोषवाक्यानुसार जर या संकल्पनाम्याची अंमलबजावणी झाली, तर प्रभागाचा चेहरामोहरा निश्चितच बदलेल, असा विश्वास रामभाऊ दाभाडे यांनी व्यक्त केला. या वेळी प्रभाग क्रमांक 03 मधील भाजप गटाच्या सौ. श्रेयस प्रीतम खांदवे, सौ. ऐश्वर्या सुरेंद्र पठारे, अनिल दिलीप सातव, रामदास दत्तात्रय दाभाडे यांच्यासह नागरिक व मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते. भारतीय जनता पार्टीच्या अधिकृत उमेदवारांनी घेतलेला हा पुढाकार लोहगावच्या नागरिकांसाठी विकासाची नवी आशा निर्माण करणारा ठरेल, असे मत अनिल सातव यांनी व्यक्त केले.
दरम्यान, सखी प्रेरणा मंचच्या वतीने द्वारका गार्डन, सोमनाथ नगर येथे आयोजित करण्यात आलेला हळदी-कुंकू समारंभ उत्साहात पार पडला. महिलांशी थेट संवाद साधत त्यांच्या प्रश्नांना समजून घेण्याचा आणि त्यांच्या सन्मानाचा सुंदर प्रसंग यावेळी अनुभवायला मिळाला. लोहगाव-विमाननगर-वाघोली प्रभाग क्रमांक 3 साठी पुणे महानगरपालिकेचे भाजप उमेदवार अनिल सातव यांच्या उपस्थितीत कार्यक्रम अधिक उत्साहात साजरा करण्यात आला. महिलांच्या सक्रिय सहभागातून विकास, सुरक्षितता व सशक्तीकरणाबाबत सकारात्मक चर्चा झाली. याशिवाय विमाननगर येथील झिरकोन सोसायटीमध्ये आयोजित करण्यात आलेली कोपरा बैठकही सकारात्मक वातावरणात पार पडली. प्रभागाच्या विकासासाठी नागरिकांनी मांडलेल्या सूचनांबद्दल आम्ही ऋणी आहोत, असे रामभाऊ दाभाडे यांनी सांगितले. महिला शक्तीवर विश्वास ठेवून विकासाच्या दिशेने वाटचाल करण्याचा निर्धार यावेळी सर्वांनी व्यक्त केला.





