ममता बॅनर्जींचे आभार मानत तृणमूलच्या आमदाराचा राजीनामा
Updated On:

कोलकाता – तृणमूल कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते राजीव बॅनर्जी यांनी आज आमदारकीचाही राजीनामा दिला आहे. ते ममतांच्या सरकारमध्ये मंत्री होते. काही दिवसांपूर्वी त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. विशेष म्हणजे राजीनामा देताना त्यांनी ममतांच्या नेतृत्वावर टीका करण्याऐवजी आपल्याला या पदांवर काम करण्याची संधी दिल्याबद्दल त्यांनी ममतांचे आभार मानले आहेत.

बॅनर्जी हे दोन वेळा विधानसभेवर निवडून आले आहेत. पश्चिम बंगालमधील डोमजूर येथून ते निवडून येत असत. आपण आमदारकीचा राजीनामा दिला असला तरी यापुढील काळातही आपण या मतदारसंघातील लोकांसाठी कार्यरत राहू असे त्यांनी म्हटले आहे. तथापि बॅनर्जी यांनी आमदारकीचा राजीनामा दिला असला तरी त्यांनी पक्ष मात्र सोडलेला नाही. यापुढील राजकीय रणनीती मात्र त्यांनी अजून स्पष्ट केलेली नाही.





