Rajinikanth । Coolie Trailer : सुपरस्टार रजनीकांत पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर धडाकेबाज कमबॅकसाठी सज्ज झाला आहे. ‘कुली’ या आगामी अॅक्शन थ्रिलर चित्रपटाचा ट्रेलर आज शनिवार, २ ऑगस्ट रोजी सायंकाळी ७ वाजता एका भव्य कार्यक्रमात लॉन्च करण्यात आला आहे. चित्रपटाला मिळाल ‘ए’ सर्टिफिकेट : ‘कुली’ चित्रपटाला सेन्सॉर बोर्डाने ‘ए’ (प्रौढ प्रेक्षकांसाठी) सर्टिफिकेट दिले आहे. यामागचं कारण म्हणजे चित्रपटातील तीव्र अॅक्शन सीन. लोकेश कनगराज दिग्दर्शित या चित्रपटात रजनीकांत ‘देवा’ नावाच्या एका स्मगलरच्या भूमिकेत झळकणार आहे. चित्रपटात सोन्याच्या घड्याळांची तस्करी आणि त्याभोवती घडणाऱ्या घटनांमध्ये रजनीकांतचा अॅक्शन अवतार दिसून येणार आहे. स्टारकास्टमध्ये मोठी नाव : या चित्रपटात रजनीकांतसोबत बॉलिवूड अभिनेता आमिर खान कॅमिओ रोलमध्ये दिसणार आहे. तसेच नागार्जुन, श्रुती हासन, सौबिन शाहीर आणि सत्यराज यांच्यासारखे लोकप्रिय कलाकारही महत्त्वाच्या भूमिकेत दिसतील. सिनेमाच्या ट्रेलरला चाहत्यांकडून मोठा प्रतिसाद मिळाला असून, अवघ्या २ तासात ३०.७ मिलियन लोकांनी हा ट्रेलर एन्जॉय केला आहे. ट्रेलरला सिनेरसिकांच्या प्रतिसाद वाढतच आहे. त्यामुळे सोशल मीडियावर सिनेमाची चांगलीच चर्चा रंगली आहे. रजनीकांतच्या ‘कुली’चा ट्रेलर आणि त्यातील अॅक्शनने आधीच चाहत्यांमध्ये उत्सुकता निर्माण केली असून हा चित्रपट प्रेक्षकांसाठी एक जबरदस्त मेजवानी ठरणार आहे, यात शंका नाही. बॉक्स ऑफिसवर ‘वॉर-2’ सोबत टक्कर : ‘कुली’ १४ ऑगस्ट रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. विशेष म्हणजे याच दिवशी ‘वॉर-२‘ हा मोठा अॅक्शन चित्रपटही रिलीज होत आहे. त्यामुळे बॉक्स ऑफिसवर दोन बिग बजेट चित्रपटांमध्ये टक्कर पाहायला मिळणार आहे.